सोलापूर – भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय टेरी टॉवेल उत्पादकांच्या प्रदर्शनाचे लॉन्चिंग गुरुवारी (४ ऑक्टोबर) सोलापुरात होणार आहे. जागतिक पातळीवरील मार्केटिंग सल्लागार जगत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हे लॉन्चिंग करण्यात येणार आहे.
टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने ४ ऑक्टोबरला (गुरुवार) सोलापुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लॉन्चिंगच्या कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योजक श्रीनिवास बुरा यांनी दिली आहे. व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्सपो समिती हे पहिले आणि एकमेव आंतरराष्ट्रीय प्रदर्शन असेल ज्याचा फोकस फक्त आणि फक्त हा भारतीय टॉवेल उद्योगावर असेल.
टेरी टॉवेलचा समस्त ग्राहक वर्ग टॉवेल उत्पादक निर्यातदार तंत्रज्ञ आणि व्यापारी या सर्व घटकांना एकाच छताखाली आणून त्यांच्यात गटचर्चा अनुभव कथन चर्चा संमेलन घडवून आणण्यात येणार आहे. या सर्व गोष्टीतून सोलापुरातील टॉवेल उद्योग विकसित व्हावा व उद्योजकांनी उन्नती साधावी या एकमेव हेतूने हे प्रदर्शन भरविण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये होणाऱ्या या प्रदर्शनाचे लॉन्चिंग गुरुवारी होणार आहे. व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्सपो व समिती हे व्हायब्रंट गुजरात मॉडेलवर आधारित आहे.
सोलापुरातील व्यावसायिक संधी समजून घेण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय व भारतीय उद्योजक खरीदार, निर्यातदार आणि आयातदार यांना एकत्र आणले जाणार आहे. सोलापुरातील टॉवेलला संपूर्ण जगातून मागणी असताना फक्त मार्केटिंगचा अभाव असल्यामुळे सोलापुरातील उद्योग वाढीस लागलेला नाही. सोलापुरातील टॉवेलला जागतिक पातळीवर नेऊन सोलापुरातील टॉवेल उद्योग भरभराटीस आणण्यासाठी सप्टेंबर २०१९ मध्ये हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
पुढील वर्षभर या प्रदर्शनाच्या निमित्ताने अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया ऑस्ट्रेलिया खंडातील ३० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रचार व प्रसार केला जाणार असल्याची माहिती या प्रदर्शनाच्या आयोजकांनी दिली आहे. यावेळी मार्केटिंग सल्लागार जगत शहा टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास बुरा अध्यक्ष राजेश गोसकी, संजय मडूर, सिद्धेश्वर गड्डम, गोविंद झंवर, जयंत आकेन, वेणुगोपाल अल्ली, गोवर्धन चाटला यांची उपस्थिती होती.