सोलापूर (प्रकाश भगेकर ) : सोलापूर विद्यापीठाच्या पंधराव्या युवा महोत्सवाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. हा महोत्सव २० ते २३ ऑक्टोबर २०१८ दरम्यान केगाव येथील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज येथे होणार आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.सूर्यकांत शिंदे यांनी दिली.
युवा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ‘उन्मेष सृजनरंगा’च्या रुपाने युवा महोत्सव या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाचा हा महोत्सव १२ ते १५ ऑक्टोबर २०१८ दरम्यान सिंहगडच्या कॅम्पसमध्ये घेण्याचा निर्णय जाहीर झाला होता. मात्र प्राध्यापकांनी संप पुकारल्याने आयोजनात अडचणी येत होत्या. प्रध्यापकांच्या सुटा संघटनेनेदेखील महोत्सवाच्या तारखेत बदल करण्याची विनंती केली होती. यामुळे युवा महोत्सव २० ते २३ ऑक्टोबर २०१८ दरम्यान केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड कॉलेज येथे होईल.
सलग चार दिवस रंगणाऱ्या युवा महोत्सवात नृत्य-नाट्य-संगीत- ललित विभागातील तब्बल २८ कला प्रकारांचा आविष्कार पाहायला मिळतो. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा यात सहभाग असतो. युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून यंदाच्या वर्षापासून यजमान महाविद्यालयास १२ लाखांचा निधी दिला जाणार आहे.
यजमान महाविद्यालय व विद्यापीठ प्रशासनाकडून महोत्सवाची तयारी केली जात आहे. यंदाचा हा युवा महोत्सव चांगला व सुंदर करण्याचा मानस कुलगुरू प्रा. डॉ. फडणवीस आणि सिंहगडचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी व्यक्त केला आहे.