महाराष्ट्र

लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांनी राजशिष्टाचाराप्रमाणे सन्मान द्यावा – आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

सातारा, दि. 4 (जिमाका) : राजशिष्टाचारानुसार सर्व अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक द्या. शासकीय होणाऱ्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर राजशिष्टाचाराप्रमाणे लोकप्रतिनधींची नावे टाका. निमंत्रण पत्रिका जिल्हाधिकारी कार्यालयाकडील राजशिष्टाचार विभागाकडून तपासून घ्या, अशा सूचना विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विधान परिषद विशेषाधिकार समितीची सातारा जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा आमदार डॉ. निलम गोऱ्हे बोलत होत्या. या बैठकीला विधान परिषद विशेषाधिकार समितीचे सदस्य तथा आमदार गिरीशचंद्र व्यास, आमदार रामराव वडकुते, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील, विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सचनि बारवकर आदी यावेळी उपस्थित होते.

विधान मंडळ, संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक द्यावी, अशा सूचना करुन डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना वागणूक कशी द्यावी यासाठी सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी परिपत्रके काढली आहेत. त्याचा अभ्यास करुन लोकप्रतिनिधींशी सौजन्याने वागावे. लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी, निवेदनांना पोहोच द्यावी. त्यांच्या पत्रांना दोन महिन्याच्या आत उत्तरे द्यावीत. लोकप्रतिनधींकडून प्राप्त होणाऱ्या पत्रांचे स्वतंत्र रजिष्टर ठेवावे. प्राप्त पत्रांचा वेळोवेळी आढावा घ्यावा. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या पत्रांना उत्तरे दिली नाही तर त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई केली जाईल. शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमांना लोकप्रतिनधींना विश्वासात घेवून आमंत्रित करावे. त्यांचे निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचाराप्रमाणे नावे टाकावीत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रमाणित करुन घ्यावे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी दर्जानुरुप आसन व्यवस्था करावी.

लोकप्रतिनिधी हे मतदार संघातील विकास कामांबाबत वेळावेळी बैठका घेतात. या बैठकीत अधिकाऱ्यांनी बैठकीच्या अनुषंगाने माहिती तयार करुन लोकप्रतिनीधींना द्यावी. लोकप्रतिनिधींनी फोन केला तर तो अधिकाऱ्यांनी उचललाच पाहिजे. काही कारणास्तव उचलू शकले नाही तर त्यानंतर त्यांना फोन करुन त्यांचे काय काम आहे याची विचारणा करावी. दर महिन्याला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी लोकप्रतिनधींसोबत दोन महिन्यातून एकदा बैठक घ्यावी. अधिकारी कसा वागतो याचा संदेश जनतेमध्ये जात असतो त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांने राजशिष्टाचाराप्रमाणे लोकप्रतिनिधींना वागणूक द्यावी. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लोकप्रतिनिधींच्या राजशिष्टाचारासंदर्भात पोलीस यंत्रणेची बैठक घेऊन राजशिष्टाचार समजून सांगावा, अशा सूचनाही विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवटी केल्या.

यावेळी समितीचे सदस्य तथा आमदार गिरीशचंद्र व्यास म्हणाले, लोकप्रतिनिधी हे स्वत:चे प्रश्न घेवून अधिकाऱ्यांकडे येत नाही. जनतेशी निगडीत प्रश्न घेवून येत असतात. त्यांच्या प्रश्नांची अधिकाऱ्यांनी सोडवणुक केली पाहिजे. लोकप्रतिनधी व अधिकारी यांच्यात विश्वास निर्माण व्हावा यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे.

प्रत्येक अधिकाऱ्याने राजशिष्टाचार प्रमाणे लोकप्रतिनधींना सौजन्याची वागणूक दिली पाहिजे. त्यांच्या प्रत्येक पत्राला उत्तरे दिली पाहिजेत. जिल्ह्यात घडत असलेल्या प्रत्येक घटनेची माहिती त्यांना द्यावी. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद वाढविला पाहिजे, असे समितीचे सदस्य तथा आमदार रामराव वडकुते यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सर्व प्रथम विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षा व सदस्यांचे स्वागत करुन त्या म्हणाल्या, आज या बैठकीत होणारी चर्चा ही अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगा. लोकप्रतिनधींचे पत्र कार्यालयांना प्राप्त होतात. त्या पत्रांना मुदतीत उत्तरे द्या. लोकप्रतिनिधींचे फोन उचला त्यांच्या प्रश्नांना नम्रपणे उत्तरे द्या. लोकप्रतिनिधींना राजशिष्टाचाराप्रमाणे सन्मान द्या. लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्यात कमी पडू नका झालेल्या कामांची माहिती त्यांना वेळोवेळी द्या. राजशिष्टाचारनुसार लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक द्या. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना परिपत्रक आणि सूचनाही देण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे यावेळी समितीच्या अध्यक्ष तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे तसेच समितीच्या सदस्यांनी दिल्या. यावेळी विधान मंडळाचे विशेषाधिकार या विषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे अवर सचिव उमेश शिंदे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी मानले. या बैठकीस जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!