नवी दिल्ली , 3 : शिर्डी शहराला स्मार्ट शहर म्हणून घोषित करावे, अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदनाव्दारे केली.
यावर्षी श्री.साई बाबा समाधि शताब्दी महोत्सव सुरू असून या माहिण्यात शिर्डी येथे मोठा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री येणार असून यावेळी शिर्डी स्मार्ट शहर म्हणून घोषित करण्याची विनंती श्री लोखंडे यांनी निवेदनामध्ये केलेली आहे.
शिर्डी या शहरामध्ये पायाभूत सूविधा चांगल्या आहेत. स्मार्ट शहरांसाठी असणारी लोकसंख्येची अट शिथील करून या शहरास स्मार्ट शहर घोषित करण्यात यावे, असे निवेदनात आहे.
शिर्डी शहरात अखील भारतीय आयुर्विज्ञान चिकित्सा संस्था (एम्स) स्थापन करण्याचीही विनंती श्री लोखंडे यांनी निवेदनात केलेली आहे.
केंद्र शासनाने लहान शहरात एम्स रूग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला असून याच धर्तीवर शिर्डी येथे एम्स रूग्णालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी श्री लोखंडे यांनी निवेदात केली आहे.