नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलाची प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षकांच्या 115 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ 5 ऑक्टोबर 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीत दिमाखात पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन, रणजीत पाटील, दीपक केसरकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र पोलिस दल हे देशातील सर्वोत्तम पोलिस दलांपैकी एक आहे. केवळ दोषींना शिक्षा करण्यासाठी आपले पोलिस दल ओळखले जात नाही, तर संवेदनशीलतेसाठी सुद्धा ते ओळखले जाते. नागरिकांची सेवा करणे आणि त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देणे हे आपले परमकर्तव्य आहे. अडचणीच्या प्रसंगी आपण परिस्थिती कशी हाताळतो, यावरच आपले व्यावसायिक कौशल्य अवलंबून असते. कायदा व सुव्यवस्था राखताना आपण संवेदनशीलता जपली पाहिजे. त्याशिवाय आपण आपल्या कर्तव्याची पूर्तता करू शकत नाही. आनंद असो की राग दोन्ही प्रसंगात आपली शिस्त कायम असली पाहिजे. तत्परता आणि संयम यात उत्तम ताळमेळ असला पाहिजे.
पोलिसांसाठी निवासस्थान असलेल्या सप्तश्रृंगी संकुलाचे उद् घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. 168 पोलिसांसाठीची ही निवासस्थाने असून त्यासाठी 41.87 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. 1500 प्रेक्षक क्षमतेच्या ओपन एअर थिएटरचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उदघाटन केले. त्यावर 3.60 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे.
प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणारे पोलीस उपनिरीक्षक
राजेश ज्ञानदेव जवरे (बुलढाणा), मारुती जगझापे (सोलापूर), किरण पाटील (धुळे) कुणाल चव्हाण (नाशिक) नागेश येनपे (सोलापूर), लक्ष्मी सपकाळे (जळगाव), मंगेश बाचकर (अहमदनगर), तर प्रकाश कदम (कोल्हापूर) यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.