मुंबई, दि. 5 : महाराष्ट्रातील समुद्रकिनारे, गडकिल्ले, पैठणी आणि विदर्भातील ताडोबाची मोहिनी शुक्रवारी ऑस्ट्रियाच्या राजदूत ब्रिगीटी ओपिंगर वॉलशॉफर यांना पडली. ऑस्ट्रिया आणि महाराष्ट्रात टुरिझम एज्युकेशन एक्स्चेंज प्रोग्राम सुरू करावा आणि पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न व्हावे, अशी इच्छा वॉलशॉफर यांनी यावेळी व्यक्त केली.
ऑस्ट्रियाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या तज्ञ आणि राजदूत असलेल्या वॉलशोफर यांनी शुक्रवारी मंत्रालयात महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली.
यावेळी पर्यटन विभागातर्फे ‘मी पैठणी, मी महाराष्ट्र’, ‘मी सिंधुदुर्ग, मी महाराष्ट्र’ ताडोबा, गडकिल्ले, समुद्र किनारे, जेजुरी खंडेराय आदी शॉर्ट फिल्म दाखवण्यात आल्या. मंत्री श्री.रावल यांनी महाराष्ट्र ही पर्यटनस्थळांची खाण असल्याचे सांगत नाशिकचे योग विद्यापीठ, वाइन कॅपिटल, विदर्भातील जंगल टुरिझम, कोकणातील समुद्रकिनारे,योग टुरिझम, वाइन टुरिझम, हेरिटेज टुरिझम, कल्चरल टुरिझमच्या संकल्पना त्यांच्या नजरेस आणून दिल्या. यावेळी दोन्ही देशांमध्ये पर्यटनाचे शिक्षण देणारी सामायिक शिक्षण संस्था उभारून आदानप्रदान व्हावे यासाठी टुरिझम एज्युकेशन एक्स्चेंज प्रोग्राम सुरू करण्याची इच्छा वॉलशॉफर यांनी व्यक्त केली. पर्यटन उद्योग वाढीच्या दृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली.
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, मौलिक शाह, आर. जे. वकील आदी यावेळी उपस्थित होते.