संपादकीय

बायोमेट्रिक हजेरीचा गवागवा कशाला…..

              सध्या मुंबई महानगरपालिकेच्या बायोमेट्रिक हजेरीचा इतका गवगवा सुरु आहे की,जगात फक्त मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारीच उशिरा येतात , मजा मारतात , काम चोर आहेत असे विदारक चित्र उभे करुन प्रशासन नकळतपणे महापालिकेचीच अब्रू वेशीवर टांगत आहे , पर्यायाने मुंबई महानगरपालिकेचे नकारात्मक चित्र जगासमोर रंगवले जात असून दुर्देवाने चित्र रंगवणारे रंगारी महापालिकेचेच(काही अपवाद वगळून) आहेत.जेथे खायचे तेथेच घाण करायची. कुठल्याही गोष्टीत मुंबई महानगरपालिका व  कर्मचारी वर्गाला टार्गेट केले जात असल्याने महापालिकेचा मूळ गाभा असणारा कामगार वर्ग व त्या अनुषंगाने येणारा इतर कर्मचारी मानसिक तणावाखाली आहे. परंतु प्रशासन आणि मिडीया सकारात्मक बाबी मात्र समोर आणत नाही असे कामगारवर्ग आरोप करत आहे.
                 दिवाळी आली की , ब-याच कंपन्या , केंद्र सरकार , राज्य सरकार व निमसरकारी आस्थापना , अनेक महापालिका , नगरपालिका कर्मचा-यांना कमी अधिक प्रमाणात बोनस जाहीर होतो पण बातम्या मात्र फक्त मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांच्या बोनसबाबतच रंगवलेल्या जातात. बोनस बाबत इतके राजकारण केले जाते की , भिक नको पण कुत्र आवर अशी गत होते. मिडीया पण बोनसचा आकडा फुगवून फुगवून सांगत जनतेच्या मनात कर्मचा-यांबाबत द्वेश निर्माण करत असते.पावसात पाणी तुंबले , रस्त्यात खड्डे पडले की मुंबई महापालिकेला झोडपायचे काम केले जाते जणू काही संपूर्ण भारतात मुंबई शिवाय कोठेही पाणी तुंबत नाही व मुंबई शिवाय सगळ्या भारतातले रस्ते हे अगदी चकचकीत गुळगुळीत आहेत.‌मुंबई महापालिकेचे अफाट , अचाट कार्य मात्र नेहमीच दु्र्लक्षित केले जाते कदाचित महापालिकेचे जनसंपर्क खाते सकारात्मक बाजू मिडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत नाही की काय हे पण कळत नाही.
                 मुंबई महानगपालिका ही स्वायत्त संस्था संपूर्ण भारतातून येथे सामावलेल्या गरीब आणि श्रीमंतांना सर्व‌ सोयी सुविधा अहोरात्र पुरवते व त्यासाठी  लाखो कर्मचारी झटत असतात. त्यांचे कौतुक कधी केले जात नाही. घाण बघितलीकी नाक मुरडणा-या पांढरपेशा वर्गाला , कच-याच्या गाडीवर नाकातोंडात मैला वाहणारा कामगार दिसणार नाही , ‘ शी ‘ शब्द ऐकला तरी घाण वाटतो ना काहींना , पण त्याच घाणीच्या मोठ्या टाक्यांमध्ये , पाईपांमध्ये उतरुन घाण साफ करणारे कामगार का दिसत नाहीत ? रुग्णालयात रुग्णांची घाण साफ करणारे , प्रेत शिवणारे , जेवण पोहचवणारे कामगार  , रुग्णांवर उपचार करणा-या पारिचारिका , डाँक्टर  का दिसत नाहीत ?बेजबाबदार  नागरिकांनी नाल्यात , गटारात टाकलेला कचरा त्यात उतरुन साफसफाई करणारे कामगार का दिसत नाहीत, या सर्व सेवा पुरवण्यासाठी अभियंत्यापासून विविध संवर्गातील कर्मचारी झटत असतात पण त्यांचे कार्य नेहमीच दुर्लक्षित केले जाते ही शरमेची गोष्ट आहे.कारण जे आपल्याला करायला घाण वाटते ते हे मनपा कर्मचारीवर्ग सातात्याने करतोच ना.मग ही अशी परिस्थिती का रंगवली जाते.कशासाठी?
                 कामचोर , उशिरा येणारे , मजा मारणारे कर्मचारी जगाच्या कानाकोप-यात आहेत. इथले खासदार , आमदार आणि नगरसेवक हजारो , लाखो रुपये पगार घेतात पण त्यांच्या हजेरीचे प्रमाण काय असते ? पाच वर्षातील कार्य काय असते ? तरी हे पांढरे हत्ती पोसले जातातच ना ?  मात्र याबद्दल‌ कोणी काही बोलत नाही. झोलझाल वेगळेच असते कदाचित काही अपवाद असतीलही , यांच्यावर कोणी साहेब नाही , आवजाव घर तुम्हारा , पगार वेळेवर , पाच वर्षांनी यांना पेन्शन लागू आणि नवीन सरकारी कर्मचा-यांना कितीही वर्षे सेवा झाली तरी पेन्शन नाही. पगारवाढीसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आणि सरकारी कर्मचारी , शेतकरी यांच्या प्रश्नावर यांची तोंड नाटकी पध्दतीने विरुध्द दिशेला !
काही कर्मचारी खरोखरच नालायक असतात त्यात अनेक खात्यातील कामगार कर्मचारी आहेत, या खात्यातील काही कामचोर , कामाशी प्रतारणा करणा-या महाभागांमुळेच महापालिका बदनाम ठरली , तसे अनेक सरकारी खात्यात असे वरिष्ठांची चाटूगिरी करुन दिवस भरत असतात. काही महिला वर्गसुध्दा आपण महिला आहोत म्हणून काम केले नाही तरी चालते अशा पध्दतीने दिवस भरत असतात.
बायोमेट्रिक हजेरी सुरु करत असताना प्रशासनाने त्यातील त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. कर्मचा-यांच्या राहण्याच्या ठिकाणाचा विचार होणे गरजेचे आहे . मशिन व त्याची रेंज आणि वेतनाशी जोडणी याचा ताळमेळ व्यवस्थित जुळवला पाहिजे. अनेक कर्मचारी वैयक्तिक , गृह कर्जधारक आहेत , त्यांच्या मासिक पगारावरच घरचा डोलारा उभा असतो , पगाराला लेट जरी झाला तरी काहींच्या संसाराचा डोलारा कोसळतो याचा खोलवर  विचार होणे गरजेचे आहे आणि कर्मचारी संघटनांनी सुध्दा श्रेयाचे राजकारण सोडून त्यांचा मूळ आधार असणा-या कामगार वर्गाचे कर्तव्यातील प्रामाणिकपणा ब्रेनवाँश करुन मध्यम मार्ग काढून कामगार कर्मचारी वर्ग उध्वस्त होणार नाही यासाठी संयुक्त लढा उभारावा.
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी सुध्दा आपल्या महापालिकेशी प्रामाणिक राहून तिचे हित जपावे कारण महापालिका असेल तरच तुम्ही कामगार म्हणून असाल हे विसरण्यासारखे नाही…!

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!