भिवंडी : नात्यातील तरुणाशी वर्षभरापासून प्रेमसंबंध जुळले होते. दोघांच्याही भेटीगाठी बोलणे-चालणे सुरळीतपणे चालू होते. मात्र, आपल्या प्रेमसंबंधातील लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होईल, या भीतीने प्रथम तरुणीने माणकोली येथील मोठ्या बहिणीच्या घरी सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर प्रेयसीच्या आत्महत्येची खबर समजताच प्रियकरानेही चौधरपाडा येथील राहत्या घरातील छताच्या हुकाला गळफास लावून ‘एक दुजे के लिये’ स्टाईल आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना भिवंडीत घडल्याचे समोर आले आहे..
आरती गुरुनाथ भोईर (२०, रा. पारिवली) व रोशन बाळाराम रंधवी (२३, रा. चौधरपाडा) अशी गळफास लावून आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. यातील मृत आरती ही प्रियकर रोशन याच्या मोठ्या भावाची मेव्हणी आहे. ती माणकोली येथील तिची मोठी बहीण सीमा हिच्या पतीचे निधन झाल्यापासून वर्षभरापासून तिच्याकडेच राहत होती. तर दुसरी मोठी बहीण रिना ही चौधरपाडा येथे असल्याने तिचे तिकडेही येणे-जाणे होते. या दरम्यान बहिणीचा दीर रोशन याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळून आले होते. दोघेही प्रेमाच्या मोहजाळ्यात अखंड बुडून गेले होते. लवकरच दोघेही लग्न करणार होते. मात्र, प्रेमसंबंधाची माहिती घरच्यांना दिल्यास ते आपल्याला विरोध करतील, अशी भीती या दोघांच्याही मनात निर्माण झाली होती. या भीतीने ग्रासल्याने आरती हिने प्रथम गळफास घेतला, तर तिच्या आत्महत्येची खबर मिळताच रोशन यानेही गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. या आत्महत्यांची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे..