
सकाळी फिरायला जाण्याचा प्रघात गेली २०-२२ वर्षे सुरू आहे…अगदी कागलपासून ( कोल्हापूर) सुरू आहे आता नवी मुंबईपर्यंत…लग्नाच्या आधी कागलला (कोल्हापूर) आईबरोबर पहाटे ५ वाजता मिट्ट काळोखात फिरायला जायचे. त्यावेळी ‘morning walk’ चे स्तोम नव्हते किंवा तशी तेव्हा गरजही नव्हती. पुणे-बेंगलोर रस्त्याने आम्ही ‘जयसिंग तलाव’पर्यंत जाऊन यायचो. रस्त्यावर त्यावेळी तुरळक वर्दळ असायची. एका बाजूने ऊस भरलेल्या बैलगाड्यांची रांग जात असे कारण कागलमध्ये भारतातील नावाजलेला “शाहू साखर कारखाना” आहे. त्या बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा होणारा आवाज अजूनही कानात रुंजी घालतो आहे..आणि रस्त्याने भरधाव जाणारी वाहने. पूर्वी दोन पदरीच रस्ता होता, रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठाली वड, पिंपळ, गुलमोहर, बहावा अशा अनेक प्रकारची झाडे. गुलमोहर आणि बहावा यांची झाडे बहरली की, ते दृश्य दृष्ट लागण्यासारखे असे….फिरून परत येताना गावात आले की, प्रत्येक घरासमोरील रेखाटलेल्या सुंदर रांगोळ्यांनी स्वागत होई. महादेव आणि रामाच्या मंदिरातील घंटानादाने मन अगदी प्रसन्न होऊन जाई….
DMLT ला असताना एक वर्ष इस्लामपूर येथे राहायला होते. तेव्हाही पहाटे बहे नाक्यापासून राम मंदिरापर्यंत रोज फिरायला जायचे. मंदिरासमोरील बागेतील हिरवळीवरील दवात चिंब भिजलेली बकुळीची फुले वेचताना मन रोमांचित होई. सुर्योदयाच्यावेळी प्रभूरामाचे दर्शन घेताना खूप समाधान वाटे.
लग्न झाल्यानंतर कळव्याला आल्यावर शिवाजी हॉस्पिटल ते दादोजी कोंडदेव स्टेडियम. ठाणे -बेलापूर रस्ता …कारण कळव्याला तसे फिरायला जायला जागाच नव्हती. रस्त्यावर एकही झाड नाही….त्यामुळे पक्षी नाही आणि त्यांचा किलबिलाट पण नाही. बरोबर ठाण्याला शाळा- कॉलेजला चालत जाणारी मुले-मुली आणि त्यांची किलबिल. त्यांच्याबरोबर चालताना एकटे वाटायचे नाही…स्टेडीयम कधी आले कळायचेही नाही. पण परतीच्या वेळी मात्र कंटाळवाणे वाटे..कारण सोबतीला ती मुले नसत….
इथे कोपरखैरणेला आल्यानंतर मात्र सकाळी जाग येते तीच पक्षांच्या किलबिलाटाने. ‘निसर्ग उद्यान’ ला जाताना घरातून फिरायला बाहेर पडले की, वाटेत २-३ शाळा लागतात; त्यामुळे मुला-मुलींची किलबिल इथेही असतेच. वेगवेगळ्या रंगांच्या गणवेशातील मुले पाहून माझेही मन शाळेतील दिवसांत नकळत जाऊन येते. वर्तमानपत्रे विक्रेत्यांची लगबग सुरू असते. खाडीकडेने चालताना पक्षांची किलबिल, भारद्वाजचा मध्येच येणार आवाज मन ताजेतवाने करून जातो…आणि भारद्वाज कुठे दिसतो का हे पाहण्यासाठी नजर झाडांवर त्याला शोधू लागते. खाडीतील समाधिष्ट बगळा पाहताना समाजातही असे वरून साधू आणि आतून भोंदू लोक वावरत असतात याची जाणीव होते.
घरातून एकटीच गेले असले तरी तिथे येणारे रोजचे चेहरे पाहिले की, एकटेपणाची जाणीव निघून जाते. कोणी चालता-चालता व्यायाम करत असतात तर कोणी हिरवळीवर बसून प्राणायाम, योग करत असतात. तरुणाई earphones घालून गाणी ऐकत चालत असतात तर काही महाभाग मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावून दुसऱ्यांनाही जबरदस्तीने गाणी ऐकायला लावत असतात. इथे सर्व भाषेतील आणि सर्व प्रकारची गाणी मग ऐकावी लागतात ….भजन, अभंग, भावगीते, हिंदी जुनी गाणी, कबिरांचे दोहे, दक्षिण भारतीय भाषेतील गाणी ऐकण्यास मिळतात तर कधी सक्काळ सक्काळी ‘सांडलेल्या बुगडीचे गाऱ्हाणे’ ही ऐकावे लागते.
मध्येच एखादा ओळखीचा चेहरा दिसतो नकळत आपल्याही चेहऱ्यावर स्मित उमलते., हास्यक्लबमधील मंडळी वेगवेगळ्या प्रकाराने आपली हास्य कला दर्शवित वातावरण हसते आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयास करीत असतात. २-३ महिला एकत्र असल्या तर हमखास कालच्या पदार्थाची चर्चा सुरू असते तसेच आज करणार असलेल्या पदार्थांच्या कृतीचीही देवघेव सुरू असते…. पुरुषांच्या ग्रुपमध्ये काल झालेल्या क्रिकेट सामन्याचा लेखा जोखा आपापल्यापरीने मांडत असतात किंवा राजकारणाच्या चर्चेला ऊत आलेला असतो.
कधी-कधी अचानक असे लक्षात येते की, नियमित फिरायला येणारे एखादे आजी किंवा आजोबा बरेच दिवस दिसलेच नाहीत. मनात नकळत शंकेची पाल चुकचुकते. पुन्हा जर ते दिसले कधी तर हायसे वाटते. काल-परवापर्यंत चांगली धडधाकट दिसणारी व्यक्ती एक-दोघांच्या आधाराने चालताना दिसली की, मन खट्टू होते. सुट्टी दिवशी तर पक्षांच्या किलबिलाटाला साथ लहान मुलांच्या किलबिलची असते. कानावर ढापणे चढवून तीच तीच गाणी ऐकण्यापेक्षा मुलांची ही गोड किलबिल, पक्षांचा किलबिलाट, मंदिरातील दूरवरून येणारा घंटानाद, आरतीचे सूर आणि वातावरणात कधी कधी निरवता असते पण तिचाही एक गूढ असा आवाज असतो तोही ऐकण्याचा प्रयत्न करावा. हा आवाज ऐकू आला तर मनाला स्थैर्य आणि शांतता निश्चितच लाभते.
निसर्ग आपल्या ऋतू बदलाच्या खुणा लहानसहान गोष्टीतून देत असतो. तो आपल्याला नेहमी खुणावत असतो, साद घालत असतो…आपले अस्तित्व दाखवत असतो फक्त आपण डोळ्यावरची आणि कानावरची ढापणे काढून पाहायला आणि ऐकायला हवे. निसर्गाची २०-२२ वर्षात इतकी वेगवेगळी रूपे पाहिली पण एक गोष्ट मात्र सगळीकडे सारखीच आहे …सकाळच्या अशा या प्रसन्न वातावरणात फिरून आले की, खूप प्रसन्न वाटते आणि दिवसही खूप छान जातो…..
सौ. ज्योती शंकर जाधव,
कोपरखैरणे, नवी मुंबई.