ठाणे

जागतिक टपाल दिनानिमित्त ठाण्यातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली पोस्ट कार्ड मुख्यमंत्री दालन मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

मुख्यमंत्री दालन मुलांच्या किलबिलाटाने गजबजले 

ठाणे, दि. 9 :  “मुख्यमंत्री महोदय,तुम्ही आमच्या शाळेला भेट द्याल का?”  “ आम्हाला नागपूरची संत्री मिळणार का? “ मला अमृता काकूंचे गाणे खूप आवडते”…….ठाण्यातल्या मोठ्या शिशु वर्गातील मुलांनी मोकळेपणाने पोस्ट कार्डांवर व्यक्त केलेले विचार वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला तितकीच मोकळेपणाने दाद दिली. निमित्त होतं ९ ऑक्टोबर,जागतिक टपाल दिनाचे.

ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभाग, चरई, वर्तकनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी पत्र लेखनाचा उपक्रम हाती घेतला असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या मुलांनी ती सर्व पोस्ट कार्ड त्यांना सुपूर्द केली. विशेष म्हणजे या शाळेतील या मुलांनी पत्र लेखन उपक्रमात कुणीही न सांगता स्वत:च्या मनाने लिखाण केले आहे.

दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांनी या सर्व मुलांना आपल्या दालनात बोलावले. आणि मग त्यांच्यात आणि मुलांत एक छान संवाद रंगला. मुख्यमंत्र्यांनी मुलांना त्यांच्या आवडी विचारल्या,नावे विचारली. मुलांनीही धीटपणे त्यांच्याशी हात मिळविले. मुख्यमंत्री दालन हे काही वेळासाठी मुलांच्या किलबिलाटाने गजबजले. मंत्रालयासारख्या भव्य वास्तूत येण्याची आणि मुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या व्यक्तीस भेटण्याची संधी मिळाल्याचा आनंद प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर दिसत होता. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांकडून मुलांचे तोंड गोड करण्यासाठी बिस्किटाचे पुडेही मिळाले त्यामुळे हा आनंद आणखी द्विगुणित झाला.

या मुलांसोबत मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण, नेहा जोशी, प्राचार्या दास देखील होत्या. संस्थेचे चिटणीस ॲड. केदार जोशी, अध्यक्ष श्री.बोरवणकर,उपाध्यक्ष नमिता सोमण यांचे या उपक्रमास प्रोत्साहन होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!