पेण दि.(प्रतिनिधी) नवरात्रोत्सवाची धूम बुधवार पासून सर्वत्र सुरु होणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही सोनखार गांवदेवी उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देवीच्या मंदिराचे यावर्षीच जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून नवीन मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना व कलशाभिषेक पुजनाने उत्सवाची सुरुवात होणार आहे .
पेण तालुक्यात गावोगावी नवरात्री उत्सवासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी मंदिरात भव्य आरास करण्यात आली आहे . पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ, सकाळ-संध्याकाळ आरती करतात . आदिशक्तिच्या आराधनेचे पर्व म्हणुन नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शक्ति आराधना करण्यासाठी नऊ दिवसांचा काळ अर्थात नवरात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे.
सोनखार येथील गांवदेवी उत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . त्या अनुषंगाने दांडिया-गरबा, स्पर्धा, खेळ, भोंडला, भजन, सांस्कृतिक , फॅन्सी ड्रेस असे विविध कार्यक्रमे यंदाही होणार आहेत. या उत्सवाचा जास्तीत-जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सोनखार येथे गांवदेवी मंडळाचे नवरात्रोत्सव
