आरोग्यदूत

सर्दी, ताप, घसादुखीचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव

मुंबई, दि. 11 : राज्यात हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लू विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे 199 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. नागरिकांनी सर्दी, ताप, घसा दुखीचा आजार अंगावर काढू नये. औषधोपचारानंतर 24 तासात बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लूच्या गोळ्या सुरु कराव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू संशयित 16 हजार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर खासगी तसेच महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्य शासनाने साथरोग नियंत्रणासाठी नेमलेल्या समितीची गेल्या आठवड्यात बैठक झाली. यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर करावयाच्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा प्रोटोकॉल करण्याबाबत चर्चा झाली. पुढील दोन दिवसांमध्ये हा प्रोटोकॉल राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना तसेच महापालिकेच्या रुग्णालयांना पाठविण्यात येईल. त्यानुसार त्यांनी स्वाईन फ्लू बाधित रुग्णांवर उपचार करणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांचे डेथ ऑडिट रिपोर्ट प्राप्त होत असून त्यात औषधोपचारास विलंब हे एक प्रमुख कारण आढळून येत असून काही रुग्णांनी स्वत: सर्दी, तापावर गोळ्या औषध घेऊन आजार अंगावर काढला आहे. आठवडाभरानंतरही प्रकृतीत फरक न पडल्याने त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतल्याचे दिसून येते. अशा परिस्थ्‍िातीत स्वाईन फ्लूवरील उपचार वेळेत न सुरु झाल्याने मृतांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्दी, ताप, घसादुखी 24 तासाच्या आत बरी न झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमी फ्लू गोळ्यांचा डोस सुरु करावा. कुठल्याही परिस्थितीत आजार अंगावर काढू नका. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

हवामानातील बदल स्वाईन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे दिसून येत असून त्यामुळे हवेच्या माध्यमातून आणि संसर्गातून विषाणूंचा फैलाव होतो, अशा वेळी शिंकताना आणि खोकताना नाका, तोंडावर रुमाल धरावा, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

नाशिक, पुणे महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येत असून महापालिका आयुक्तांनी या संदर्भात दर आठवड्याला आढावा बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच जाणीव जागृती तसेच खासगी वैद्यकीय डॉक्टरांनी वेळेत उपचार करण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!