गुन्हे वृत्त

“जागर स्त्रीशक्तीचा” खाकीतील रणरागिणी पोलीस शिपाई जयश्री जाधव यांची उत्तम कामगिरी; रेल्वेत मोबाईल लांबवणाऱ्या १७ वर्षीय मुलीला रंगेहाथ पकडले

मुंबई :  गर्दीचा फायदा घेऊन धावत्या रेल्वेत मोबाईल चोरणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला महिला पोलीस शिपाई (बक्कल नं. ११२२७०) जयश्री जाधव रंगेहाथ पकडले. या प्रकरणी वाशी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या मुलीविरुद्ध पूर्वीपासून ५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून, त्यापैकी ३ गुन्हे वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

गोवंडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस शिपाई (बक्कल नं. ११२२७०) जयश्री जाधव या नागपाडा मोटार परिवहन विभाग ट्रेनिंगसाठी गेल्या होत्या. ९ वाजता ट्रेनिंग संपल्यानंतर भायखळा येथून लोकलने कुर्ला स्थानकात उतरल्या. त्यानंतर कुर्ला हार्बर मार्गावरील ९.४३ वाजण्याच्या सुमारास पनवेल लोकलने पोशि जयश्री जाधव यांनी पुन्हा प्रवास सुरू केला. लोकल टिळक नगर रेल्वे स्थानकात येताच महिला डब्यातील एका महिलेचा मोबाईल चोरीला गेल्याने एकच गोंधळ उडला. त्यात लोकल स्थानकातून निघाली. त्यावेळी सर्वांची नजर चुकवून १७ वर्षीय मुलगी मानखुर्द रेल्वेस्थानकात उतरत असताना पोशि जाधव यांनी तिला अडवले. तिच्यावर संशय आल्याने तिच्या बॅगेची झडती घेत असता त्यात ४ मोबाईल सापडले. बॅगेची झडती घेत असताना तिने महिलेचा चोरलेला मोबाईल खाली फेकला. सिटच्या खाली पडलेला मोबाईल आपलाच असल्याचे त्या महिलेने सांगितले.

दरम्यान, पोशि जयश्री जाधव यांनी कंट्रोल रुमला माहिती दिली. वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीविरुद्ध (गु. र. क्र. ११२/१८) भादंवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात असून, न्यायालयाने तिची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. या मुलीविरुद्ध वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यात यापूर्वीच ३ व अन्य पोलीस ठाण्यांमध्ये २ गुन्हे दाखल असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वाशी लोहमार्ग पोलिसांनी दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!