मुंबई, दि.१२: राज्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागात परवडणारी,सहज उपलब्ध होणारी उत्कृष्ट दंत चिकित्सा सेवा सुरू केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होईल. मौखिक आरोग्य सेवेची पायाभूत सुविधा जिल्हा रुग्णालये, धर्मार्थ दवाखाने, नागरी आणि सार्वजनिक दवाखाने येथे बळकट करण्याची गरज असून दंत चिकित्सेच्या क्षेत्रात‘मेक इन इंडिया’ सारख्या उपक्रमातून वैद्यकीय उपकरणे आणि उपचाराचा खर्च कमी करण्याची आवश्यकता असल्याचे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केले.
येथील हॉटेल सहारा येथे इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय मौखिक आरोग्यनिगा ‘सुश्रुत’पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
राज्यपाल म्हणाले, दंत चिकित्सेच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रचंड वेगाने प्रगती होत आहे. तंत्रज्ञानामुळे निदान करणे, रुग्णाला सहजपणे उपचार उपलब्ध करून देणे शक्य झाले ही समाधानकारक बाब आहे. देशातील ६० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात, तेथे त्यांना मौखिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे.
मौखिक आरोग्य महत्त्वाचे असले तरी लोक त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. माझ्या दृष्टीने याची तीन कारणे आहेत. मौखिक रोगांमुळे जीवन धोक्यात येत नाही, सहजपणे मौखिक आरोग्य सेवा उपलब्ध नाही आणि मौखिक आरोग्य उपचार अतिशय खर्चिक आहे. त्यामुळे बहुसंख्य लोक दातांच्या आजारांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे मात्र आरोग्याची गुंतागुंत मात्र अधिकच वाढते.
मौखिक आरोग्य सेवेची उपलब्धता ही खूपच मर्यादित आहे. महानगरांमध्ये दंत चिकित्सकांची संख्या बरी असली तरी लहान शहरे,ग्रामीण भागात त्यांची संख्या मात्र नगण्य आहे.
इंडियन डेंटल असोसिएशनने याबाबत गांभीर्याने विचार करावा आणि योग्य प्रशिक्षित दंत चिकित्सकांची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. या क्षेत्रातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या स्तरावर प्रयत्न करावे आणि आवश्यक तेथे सुधारणा सुचवाव्यात, असेही राज्यपालांनी सांगितले.
मुख कर्करोग मौखिक आरोग्याचे एक मोठे आव्हान आहे. यारोगाची लक्षणे प्रथम दंतवैद्यांना दिसू शकतात. त्यामुळे त्यांची भूमिका या रोगाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरते. तरुण पिढीला व्यसनापासून रोखून मौखिक कर्करोगाचे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांची दंत चिकित्सा नियमितपणे करता येईल काय यासंबंधी असोसिएशनने प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी राज्यपालांनी केले. सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून दंतचिकित्सेसाठी मोबाईल व्हॅनचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. एल. के. गांधी यांना दंतचिकित्सा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. राजीव बोरले, डॉ. सुवास दारव्हेकर, डॉ. टी. समराज, डॉ. विजयालक्ष्मी आचार्य, डॉ. माधवी जोग, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. कॅथरीन केल यांना या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच भारतीय सेनेतील डॉक्टरांचा राज्यपालांच्या हस्ते सुश्रुत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी आणि दंतचिकित्सा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आणि समारोप राष्ट्रगीताने झाला.