मुंबई, दि. 15 : मुंबई येथील 100 वर्ष जुन्या आदिवासी पाड्यांचे प्रश्न, तेथील समस्या याबाबत सर्व संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन ते मार्गी लावावेत, असे निर्देश आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे दिले. या संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग यांनी संयुक्तपणे सर्वेक्षणाची मोहीम राबवावी. येथील रहिवाशांना जातीचे प्रमाणपत्र, ते कसत असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्यांच्या नावाच्या नोंदी तसेच प्राथमिक शाळा, दवाखाना आदींबाबतच्या सर्व सोयीसुविधा महानगरपालिका व इतर संबंधित यंत्रणेने देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही श्री. सवरा यांनी यावेळी सांगितले.
आदिवासींची पाडलेली घरे, जामदार पाडा येथील विहिर, बोरीवली येथील तलावात झालेले अतिक्रमण यासंदर्भातही सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. मुंबई बोरीवली येथील गोराई मनोरी मालाड भागातील जवळपास 15 आदिवासी पाड्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी तसेच पाड्याचे आदिवासी बांधव, आदी उपस्थित होते.