प्रासंगिक लेख

रंग नवरात्रीचे..

     नवरात्र उत्सव सुरू झाला की प्रत्येक जण विशेषतः महिलांना फारच उत्साह असतो…नवरात्रात रोज वेगवेगळ्या रंगांच्या साड्या, ड्रेस घालायला मिळणार असते. नवरात्रात प्रत्येक जण रोज एका रंगात न्हाऊन जातो. घटस्थापनेपासून रोज एका वेगळ्या रंगात सर्वजण रंगतात त्या रंगाचे कपडे लेऊन.
     खरेतर ही सुंदर संकल्पना १२-१३ वर्षापूर्वी प्रथम महाराष्ट्र टाइम्सने मुंबईच्या महालक्ष्मी मंदीर ट्रस्टला सांगितली, ती त्यांनाही आवडली आणि तेव्हापासून ही नवरात्रीतील रंगांची किमया सुरू झाली…नवरात्र नवरंगात रंगायला लागली.
     आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचे(वार) महत्त्व वेगळे आणि प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी-देवतांचा त्यावरून हे रंग ठरवले जातात..उदा. सोमवार महादेवांचा वार …भगवान महादेवांना पांढरा रंग आवडतो म्हणून पांढरा तसेच मंगळवार गणपतीचा वार…बाप्पाला लाल जास्वंद आवडते म्हणूनलाल रंग….इ. अशाचप्रकारे  संपूर्ण आठवड्यातील रंग ठरविले जातात.
     प्रत्येक रंगाला एक विशिष्ट महत्त्व आहे आणि त्या रंगातून आपल्याला एक ऊर्जा मिळत असते. प्रत्येक रंग कशाचे तरी प्रतीक असतो आपल्याला एक संदेश देत असतो.
*लालः ऊर्जेचा, प्रेरणेचा, सुवासिनीच्या कुंकवाचा.
*निळा: अथांगतेचा, अवकाशाचा, अवकाशातून पाहताना आपल्या धरेचा.
*पिवळाः नव्या दिशेचा अन् आशेचा, वैभवाचा आणि मांगल्याचा.
*हिरवा: निसर्गाचा, समृद्धीचा, नववधूच्या हिरव्या चुड्याचा.
*केसरी : उगवणाऱ्या सूर्याचा, शिवरायांच्या विजयी भगव्याचा, वारकर्‍यांच्या दिंडीतील पताकेचा.
*गुलाबी : प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, सुखद स्वप्नांचा.
*जांभळा : संयमाचा, दूरवर दिसणार्‍या सुंदर नगांचा. क्षोभ आणि शांतता यांच्या अजब मिलाफाचा.
*पांढरा : पावित्र्याचा, कोमल सुंदर पारिजातकाचा, शीतल प्रकाश देणार्‍या चंद्राचा, शांततेचा.
*काळा: गूढतेचा,  मंगळसूत्रातील सौभाग्य मण्यांचा, बाळाला लावलेल्या तिटाचा, आषाढात बरसणार्‍या ढगांचा.
     रंगांचा मुख्य स्त्रोत खरेतर सूर्य आहे. सूर्य किरणांतूनच सात रंग आपल्याला मिळतात….लाल, नारंगी, पिवळा,  हिरवा, निळा, पांढरा अन् जांभळा. हे सात रंग आपण श्रावणातील इंद्रधनूत पाहतोच. या मुख्य रंगांचे पुन्हा प्रत्येकी तीन फिकट, नेहमीचा आणि गर्द असे प्रकार पडतात आणि असे 21 रंग तयार होतात. दोन तीन रंगांचे मिश्रण करून नवनवीन रंग तयार होतच असतात.  माझे तर आवडीचे दोन रंग  एक पांढरा ज्याच्यपासून हे सर्व रंग तयार होतात आणि दुसरा काळा जो सर्व रंगांना आपल्यात सामावून घेणारा.
      आपल्या जीवनात रंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.  रंगांमुळे वेगवेगळी स्थिती आपण समजू शकतो.  हिरवाईने, फुला-फळांनी सजलेला निसर्ग, डोंगरदर्‍या, आकाशातील सुर्योदय व सुर्यास्ताच्या वेळचा विलोभनीय देखावा…ती रंगांची मुक्त हस्ते केलेली उधळण, हिरवीगार शेते, मोराचा सुंदर पिसारा बर्फाच्छादीत पर्वतरांगा, हिमशिखरे हे सारे सारे रंगामुळे   देखणे आणि मनोहारी बनते. जर हे रंगच नसते तर वसंतातील, श्रावणातील नटलेला निसर्ग आणि शिशिरातील पानगळीचा निसर्ग,  दुष्काळातील वाईट स्थिती, वाळवंट सर्व एकसारखेच वाटले असते.
     लहान मुले तसेच वृध्द नागरीकहे सुध्दा बरेचवेळा रंगांमुळे वस्तू ओळखतात. काही काही वेळा तर अशिक्षित लोकही फक्त रंगांचे माध्यम वापरून बर्‍याच गोष्टी आत्मसात करून घेतात. आपणही उदा. लाल रंगाचे निशान किंवा खूण दिसली की तिकडे जाणे निषिद्ध आहे,  धोक्याचे आहे, हे कळून येते.  सिग्नलच्या दिव्यांमुळे प्रवासही सुलभ होतो.
     हे असे रंग आपल्या आयुष्यात भरून राहिले आहेत, तसेच सावळा गं रामचंद्र,  घननीळा बरसला, निळकंठी महादेव, सावळ्या विठ्ठला, नीलवर्णी कृष्ण, पिवळे पितांबर,पिठूर चांदणे, काळेभोरकेस, निळे डोळे अशी रंगांच्या नावनेशापण दैवी-देवता, पशू पक्षी,  वस्तूना आपण लावत असतो. असे रंग आपल्या जीवनाचाषभाग बनले आहेत. वर्षभर रोज कोणीही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करत असले तरी नवरात्रात मात्र प्रत्येक दिवशी ठरलेल्या रंगांचेशकपडे घालून देवी-देवतांची उपासना करतात, मुलेमुली काॅलेजला जातात, नोकरदार महिले पुरूष वर्ग कार्यालयात जातात. यामुळे तेथील वातावरणात या नऊ दिवसात वेगळाच उत्साह असतो, सर्व वातावरण भक्तीने भारलेले असते. असे एकाच रंगात रंगलेले सर्वजण नवरात्रात जणू  एकात्मकतेचा संदेशच देत आहेत, असे वाटते. चला तर मग मित्र-मैत्रिणींनो आपणही या नवरात्रीच्या नवरंगात रंगून जाऊ आणि त्या आदिमायेची उपासना करू…….
सौ. ज्योती शंकर जाधव, 
कोपरखैरणे, नवी मुंबई.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

ठाणे

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरघर तिरंगा अभियान सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील आद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळांची दयनीय अवस्था ?जिल्हाधिकां-याचा सकारात्मक प्रतिसाद !

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!