मुंबई : 2 वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी इसमाच्या हत्येचा कट रचणाऱ्यासह तिघांना दिल्लीत बेड्या ठोकण्यात आल्या. ही धडाकेबाज कारवाई मुंबई गुन्हे प्रकटीकरणच्या गुप्त वार्ता पथकाने करून 48 तासांत हत्याकांडाचा उलघडा केला. या आरोपींना 24 ऑक्टोबर 2018 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मनोजकुमार मौर्या व त्याची पत्नी 2015 ते 2017 या दरम्यान दिल्लीत राधाकृष्ण मुनारिका खुशवहा (३७) या व्यावसायिकाकडे काम करत होते. व्यावसाय बुडल्याने तोट्यात आलेल्या व्यावसायिकाचे काम सोडून मोर्या दाम्पत्याने मुंबई गाठली. दादर परिसारत मनोजकुमार कुटुंबीयांसह राहू लागला होता. काम सोडण्यापूर्वी मनोजकुमारचे खुशवाह याच्यासोबत तडाख्याचे भांडण झाले होते. या भांडणाचा राग खुशवाह याच्या डोक्यात होता. त्यासाठी त्याने मनोजकुमारच्या हत्येचा कट रचला.
मनोजकुमारचा खून करण्यासाठी खुशवाह याने राजेंद्र अमर सिंग (३५) व हेमेंद्र ब्रिसभाग कुशवाह (१९) यांना 50 हजार रुपयांची सुपारी दिली. मनोजकुमारवर गोळ्या झाडण्यासाठी शूटर सिंग व कुशवाह यांनी 6 हजार रुपयांत रिव्हॉल्व्हर विकत घेतले.
मनोजकुमारची माहिती देण्यासाठी खुशवाह हा सिंग व कुशवाह यांना मुंबईत घेऊन आला. मनोजकुमार याच्यावर रात्रन् दिवस वॉच ठेवून 12 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांनी संधी साधली. त्या दिवशी सकाळी 6:30 वाजता मनोजकुमार घराबाहेर पडला. मनोजकुमारचा दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्यांनी दादर परिसरातील सेनापती बापट मार्ग येथे मनोजकुमार याच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी दादर परिसरात (गु. र. क्र. 232/18) भादंवि कलम 302 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, 28 नुसार गुन्हा दाखल केला. दादरमध्ये खळबळ उडवून टाकणाऱ्या हत्याकांडाचा तपास मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सर्व पथके करू लागले. तपास सुरू असताना गुप्त वार्ता पथकाला हल्लेखोरांची माहिती मिळाली. त्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने दिल्लीत जाऊन राधाकृष्ण खुशवहा व सुपारी घेतलेल्या राजेंद्र सिंग व हेमेंद्र कुशवाह यांना बेड्या ठोकल्या.
पूर्ववैमनस्यातून झालेले हत्याकांड गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त (डी-विशेष) संजय कदम, गुन्हे प्रकटीकरणच्या गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुधाकर देशमुख, सपोनि चव्हाण, काझी, होवाळ, लोंढे, राऊत, पोउनि पाटील, सपोउनि वाघ, जाधव, हवालदार पवार, मोहिते, मोरे, पावले, पोना तडवी, शिंदे, जगदाळे, कांबळे, पावरी, पोशि मोरे, भोसले, पाभारे, गावंड आदी पोलीस पथकाने ४८ तासात उघडकीस आणले.