मुंबई, दि. 16 : महादेव कोळी व मल्हार कोळी जमातीच्या संदर्भात पुणे विद्यापीठात अभ्यास सुरु असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. या जमातीच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे केले. आदिम विकास परिषदेच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या जमातीच्या संदर्भात सुरु असलेल्या अभ्यासाचा अहवाल लवकर मिळणे अपेक्षित आहे, असे सांगून मंत्री श्री.सवरा यांनी या जमातींकडे असलेले विविध पुरावे त्यांनी संबंधित समितीकडे द्यावेत. असे आवाहन शिष्टमंडळास केले.
शिष्टमंडळातील बाळकृष्ण बंडेवार यांनी प्रारंभी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. या जमातीस भेडसावणाऱ्या व्यवहार्य समस्यांबाबत त्यांनी माहिती दिली. यात प्रामुख्याने जातीचे प्रमाणपत्र पडताळणी, नवीन पिढीसाठी जातीचे प्रमाणपत्र मिळणे, शिष्यवृत्ती, आश्रमशाळा, शाळा प्रवेश व इतर सवलती मिळणे, जात पडताळणी अर्ज नाकारणे अशा अडचणी त्यांनी यावेळी मांडल्या.