भारत

देशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती; २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प : प्रधानमंत्री

शिर्डी येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप. संस्थानच्या विविध कामांचे भूमिपूजन. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना चाव्या प्रदान

शिर्डी, दि. 19:- देशातील बेघरांना सन 2022 पर्यंत घर देण्याचा संकल्प सरकारने केला असून गेल्या 4 वर्षात सव्वा कोटी घरांची मूलभूत सोयीसुविधांसह निर्मिती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

शिर्डी येथे साई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप, संस्थानच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन आणि राज्यातील अडीच लाख घरकुलांच्या लाभार्थींना घरकुलाच्या चावीचे वितरण आणि राज्यातील इतर लाभार्थ्यांच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील,  खासदार रावसाहेब दानवे, दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, आमदार शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी उपस्थित होते.

श्री. मोदी म्हणाले, देशातील सर्वसामान्यांना विश्वास वाटावा असे काम केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या 4 वर्षांत केले आहे. सर्वसामान्यांना आधार देणारी घरकुल योजना, आरोग्यासाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या हिताची कामे करण्यात आली. याशिवाय, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजनेच्या माध्यमातून गरीबांना गॅस आणि वीज देण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याबद्दल त्यांनी राज्य शासन आणि मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे तसेच राज्यातील 11 कोटी नागरिकांचे कौतुक केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, स्वत:च्या घराचं स्वप्नं बघणाऱ्या लाखो कुटुंबांना चांगले घरकुल विजयादशमीची भेट आहे. घरकुलाच्या माध्यमातून गरिबीवर मात करण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना सर्व नागरिकांना घरे देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सन 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचा संकल्प करीत असताना ही घरे तुलनेने मोठ्या आकाराची आणि सर्व सोयींनी युक्त देण्यात येत आहेत. त्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 70 हजारावरून आता 1 लाख 20 हजार इतकी वाढ कऱण्यात आली आहे. ही रक्कम थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत असून लाभार्थ्यांची निवड पारदर्शकतेने करण्यात येत आहे.

गरिबांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गरिबांच्या कल्याणासाठी सुरु कऱण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ देशातील 50 कोटी नागरिकांना मिळणार आहे. आतापर्यंत देशातील एक लाख रुग्णांना योजनेचा लाभ देण्यात आला असून प्रत्येक रुग्णामागे सरासरी 20 हजार रुपये खर्च झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्रात यावर्षी पाऊस कमी झाल्याने काहीशी चिंता आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून  शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. तसेच राज्य शासनाद्वारे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठीही केंद्र शासन भरीव मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत राज्यात विविध प्रकल्पांची कामे करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून 16 हजार गावे टंचाईमुक्त झाली असून 9 हजार गावात कामे सुरू असल्याचे ते म्हणाले. राज्याने या योजनेच्या अंमलबाजवणीत चांगली कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याचा अनेक शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे त्यांनी  नमूद केले.

शिर्डीसारखे धार्मिक स्थळ तर अजिंठा वेरुळसारखा ऐतिहासिक वारसा देशाला लाभला आहे. आस्था, अध्यात्म आणि इतिहासाची सांगड पर्यटनाशी घालून रोजगार निर्मितीला चालना देण्यात येत असल्याचे श्री. मोदी यांनी सांगितले. टुरिझम सर्किटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देताना शिर्डी येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानसेवेचा विस्तार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोट्यवधी लोकांची सेवा करण्याची आणि जनसेवेप्रती समर्पित होण्याची प्रेरणा साईबाबांच्या सेवा संदेशातून मिळते. सर्व समाजाला एका सूत्रात बांधण्याचे सामर्थ्य त्यांच्या ‘सबका मालिक एक’ या मंत्रात असल्याचे श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

 

शिर्डी संस्थानच्या दर्शन रांग इमारतीचे भूमिपूजन, शैक्षणिक संकुल, 10 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प आणि साईसृष्टी प्रकल्पाचा शुभारंभही यावेळी श्री. मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थानच्या वतीने साई प्रतिमा असणारे चांदीच्या नाण्याचे अनावरण व लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात एक नाणे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना देण्यात आले.

 

केंद्र शासनाच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्राला मोठी मदत– मुख्यमंत्री

केंद्र शासन नेहमीच महाराष्ट्राला विविध योजना आणि प्रकल्पांसाठी मदत करीत असते. यावर्षी निसर्गाची अवकृपा झाल्याने 201 तहसीलमध्ये पाऊस कमी झाला आहे. अशावेळी या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र शासन मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

उत्पादन मूल्यावर आधारित दीडपट भाव देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. शेतकऱ्यांसाठी स्वयंपूर्णता आणण्यासाठी केंद्र सरकार काम करीत आहे. त्या योजनांची अंमलबजावणी राज्यात चांगल्या प्रकारे व्हावी, असे काम सुरु आहे. त्यामुळे राज्यातील सध्याच्या परिस्थितीत  केंद्र शासन मदतीचा हात देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत. कुकडी आणि निळवंडे धरणाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यात येतील. नगर शहरातील उड्डाणपुलासाठीही 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, गरीबांसाठी काम करण्याची प्रेरणा शिर्डी येथून मिळते. स्वातंत्र्याची 75 वर्षे लवकरच पूर्ण होत आहेत. अशावेळी सर्वांना घरे देण्याची महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाला जाणार आहे. राज्याला दिलेल्या 4 लाख 50 हजार घरांपैकी 2 लाख 50 हजार घरे पूर्ण झाली आहेत. दिवाळीपर्यंत आणखी 50 हजार घरे  पूर्ण होतील. राज्याला आणखी 6 लाख घरकुलांसाठी परवानगी देण्याची विनंती केंद्र शासनाला केली असून मंजुरी मिळाल्यास मोहिम स्तरावर डिसेंबर 2019 पर्यंत घरकूल बांधण्यात येतील, असेही  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

भूमीहिनांना घरे देण्याबरोबरच स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीतही शासन विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिर्डी हे शहर धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर यापुढील काळात ‘नॉलेज हब’ म्हणून हे शहर पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुविधा याठिकाणी निर्माण होत असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात श्रीमती मुंडे म्हणाल्या, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्याला मिळालेल्या साडेचार लाख घरकुलांपैकी अडीच लाख घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. या घरकुलांसाठी 3 हजार 472 कोटी खर्च करण्यात आला आहे. लभार्थ्यांना रोहयो अंतर्गत 90 दिवसाचा रोजगार, सौभाग्य योजनेअंतर्गत वीज कनेक्शन आणि उज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येते. 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे धोरणाअंतर्गत राज्यातील 10 लाख 51 हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरे  देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात प्रधानमंत्री आवास योजनेच्या 10 लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.

यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते घरकुल प्रवेशाचा कलश आणि चाव्या इंदुबाई खवळे (रा. नायगाव, जि. अहमदनगर), सूर्यभान बरडे (लोणी, जि.अहमदनगर), अनिता विटकर (खंडाळा, जि. औरंगाबाद), नंदा बोंबले (खंबाळे, जि. नाशिक), शिवराम वाघमारे (बुबळी, जि. नाशिक), रत्ना दुमसे (अभोना, जि. नाशिक), सखुबाई मेंगाळ (ठाकरवाडी, जि. नाशिक), सोनाली कांबळे (जवळगाव, जि. बीड), लंकाबाई जगताप (कानडीखुर्द, जि. बीड), मंदा मोरे (टाकळीहाजी, जि. पुणे) या लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आला.

तत्पूर्वी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपाचे ध्वजावतरण करण्यात आले. संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसमवेत श्री साईबाबा समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

शिर्डी येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत

शिर्डी विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, विधानसभा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जि.प.अध्यक्ष शालिनी विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, दिलीप गांधी, आमदार स्नेहलता कोल्हे, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, विभागीय आयुक्त राजाराम माने, मे.ज. निरज कपूर आदी उपस्थित होते

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!