डोंबिवली : महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाने सन २०१८-१९ या वर्षाच्या पाणी नियोजनासाठी उल्हास नदीतून उपसा करणा-या संस्थांना २२ टक्के पाणी कपात करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. या पार्श्वभुमीवर कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेतर्फे २१ ऑक्टोबर २०१८ ते १५ जूलै २०१९ या कालावधीत दर मंगळवारी चोविस तास (सोमवार रात्री १२ ते मंगळवार रात्री १२.०० वा. ) बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रांतून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
वरील पाणी कपात लक्षात घेवून नागरिकांनी सदर दिवशी पुरेसा पाणीसाठा करुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. २७ गावे जरी पालिकेत असली तरी त्यांना पाणी पुरवठा एम आय डी सी करत असल्याने २७ गावात गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ असा २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे परिणामी शनिवारी व बुधवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. २७ गावात सध्याच पाणी पुरवठा कमी होत असल्याने पाणी कपात केल्याने नागरिक त्रस्त होणार आहेत