नोकरी देणारे आणि मागणारे यांच्यात या मेळाव्याद्वारे मेळ घालण्याचा प्रयत्न- उद्योगमंत्री
मुंबई, दि. 20 : नोकरी देणारे आणि नोकरी मागणारे या दोघांमध्ये बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मेळ घालण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. यातूनच तरुण, तरुणींना नोकरीची संधी मिळाली आहे, असे उद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग व सीआयआयच्यावतीने गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार सुनील प्रभू, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई इमारत व दुरुस्ती महामंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, सीआयआयचे सतीश खन्ना आदी उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून तरुणांना घर चालवण्यासाठी हक्काची किल्ली मिळाली -उद्धव ठाकरे
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून मराठी तरुणांच्या हाताला केवळ नोकरीच मिळणार नाही, तर घर चालवण्यासाठी हक्काची किल्ली मिळाली आहे,असे गौरवोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. बाळासाहेब ठाकरे यांनी तरूणांना रोजगार मिळावा यासाठी सातत्याने काम केले. त्यामुळे त्यांच्याच नावाने हा मेळावा घेण्याची कल्पना सुचली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रयत्नामुळे हे मेळावे यशस्वी झाले आहेत. अन्न, वस्र, निवाऱ्याच्या सोई पुरवणे शासनाचे कामच आहे. परंतु या मेळाव्यातून तरुणांना घर चालवण्यासाठी हक्काची चावी मिळणार आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले. |
बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या चळवळीची सुरुवात नोकरीच्या प्रश्नापासून केली, जेव्हा मराठी मुलांसाठी नोकऱ्यांचे दरवाजे बंद होते. तेव्हा बाळासाहेबांनी आंदोलन केले. त्यानंतर मराठी मुलासाठी नोकरीची दालनं खुली झाली. अनेक कंपन्यांत बाळासाहेबांच्या प्रयत्नाने असंख्य तरुण तरुणींना नोकरीची संधी मिळाली. त्यामुळे या मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे उचित ठरते, असे उद्योग मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, पुणे, नवी मुंबई, नाशिक, कोल्हापूरनंतर आज गोरेगाव येथे मेळावा होत आहे. या मेळाव्यात शंभरहून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे. मेळाव्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने सुमारे दहा हजार मुलामुलींनी नोंदणी केली आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला नोकरीची संधी मिळणार आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला नोकरीची नियुक्तीपत्रे दिली जातील. ज्यांना पत्र मिळाले नाही, प्रत्येक आठवड्याला कार्यक्रम घेऊन पुन्हा नोकरीची संधी दिली जाईल. लागोपाठ तीन चार आठवडे याचा पाठपुरावा केला जाईल.
अभ्यासक्रमात बदल आवश्यक असल्याचे मत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले. उद्योग नोकऱ्या निर्माण करते, परंतु कुशल कामगार निर्माण करणे माझ्या खात्याचे काम आहे. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचं प्रशिक्षण तरुणांना दिले जात आहे. आतापर्यंत जुना अभ्यासक्रम सुरू होता. त्यात बदल करण्यास सुरुवात केली आहे. हा बदल झाल्यास उद्योगांना कुशल कामगार मिळू शकतील, असे श्री.वायकर म्हणाले.
पुणे येथे घेतलेल्या रोजगार मेळाव्यात ११ हजार जणांनी प्रतिसाद दिला. नाशिक येथील मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. आज पाचवा रोजगार मेळावा गोरेगाव येथे होत आहे. महाराष्ट्र औद्योगिकरित्या प्रगतीशील राज्य म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे प्रमाण चांगले, नवयुवकांचे प्रमाणही जास्त. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ उपलब्ध आहेत. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन उद्योगांना लागणारी गरज उपलब्ध करुन देणार आहे. तीन वर्षांमध्ये उद्योग विभागाने सात ते आठ उद्योग धोरण आणले. इज ऑफ डुईंग सोबत मैत्रीची स्थापना केली. यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. आम्ही राबवत असेलेल्या धोरणानुसार महाराष्ट्राने महिला उद्योजकांसाठी नवीन धोरण आणले आहे. आतापर्यंत नऊ हजार तरुण-तरुणींना रोजगार दिला आहे. ज्यांना नियुक्तीपत्र मिळाले नाही, त्यांना पुन्हा बोलावून मुलाखती घेतल्या जाणार आहेत, असे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
१६११ तरुण-तरुणी नोकरीसाठी पात्र
या रोजगार मेळाव्यात अडीच हजार मुला-मुलींना हजेरी लावली. त्यातील १६११ जणांना नोकरीसाठी पात्र ठरवण्यात आले. त्यापैकी ३१० जणांना तत्काळ नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आज प्राथमिक स्तरावर मुलाखती झालेल्या असल्या तरी उर्वरित मुला-मुलींना पुढील आठवड्यात बोलावून पुन्हा मुलाखती होणार आहेत. पुढील तीन आठवडे ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. नोंदणी केलेल्या अधिकाधिक मुलांना नोकरी मिळेपर्यत पाठपुरावा केला जाणार आहे. दिव्यांगासाठी विशेष दालन गोरेगाव येथील रोजगार मेळाव्यासाठी दिव्यांग मुला-मुलींसाठी खास दालनाची सोय करण्यात आली होती. या दालनाला ३० मुला-मुलींनी भेट दिली. त्यांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून त्यांना नोकरीची ऑफर दिली जाणार आहे. |