देशातील पहिल्या मुंबई – गोवा लक्झरी क्रुझ सेवेचाही झाला शुभारंभ
मुंबईकरांसाठी ऐतिहासिक क्षण
मुंबई, दि. २० : देशातील मुंबई – गोवा या पहिल्या लक्झरी क्रुझ सेवेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. आंग्रीया नावाच्या या लक्झरीयस जहाजाला झेंडी दाखवून मुख्यमंत्र्यांनी या सेवेचा शुभारंभ केला. याबरोबरच मुंबईतील देशांतर्गत क्रुझ टर्मिनलचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले. या सुविधांच्या विस्तारानंतर मुंबईसह महाराष्ट्राच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. भविष्यात यामुळे अंदाजे ३० हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल,जलवाहतूक आदी विविध उपक्रमांमुळे सुमारे अडीच लाख नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे.
राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल,शिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, आमदार आशिष शेलार, राज पुरोहीत, अमीन पटेल, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया, दै. तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर,कॅ.नितीन धोंड, रघुजीराजे संभाजीराजे आंग्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नवीन बंकरींग टर्मिनलचे (समुद्री पेट्रोलपंप) उद्घाटन, ड्राय डॉकचे कोचीन शिपयार्डला हस्तांतरण, जवाहर द्वीप येथे टँक फार्मसाठी रेक्लेमेशन तयार करण्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजन,देशांतर्गत क्रुझ टर्मिनलच्या इमारतीचे उद्घाटन आदी कार्यक्रमही यावेळी झाले.
मुंबईच्या पूर्वी किनाऱ्याचा होईल गतीने विकास – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले की, क्रुझ टर्मिनल,जलवाहतूक यांसारख्या विविध योजनांमुळे मुंबईच्या पूर्वी किनाऱ्याचा गतीने विकास होईल, या किनाऱ्याचे महत्त्व वाढेल. सुमारे 200 वर्षानंतर मुंबईचा पूर्वी समुद्र किनारा लोकांसाठी खुला होत आहे. मुंबईत लवकरच मरीना क्लबही सुरु होत आहे. जलवाहतुकही सुरु होणार आहे. आजदेशांतर्गत क्रुझ टर्मिनल आणि देशातील पहिली देशांतर्गत क्रुझ सेवा सुरु झाली आहे. मुंबईच्या विकासाला यातून मोठी गती मिळणार आहे, असे ते म्हणाले.
30 हजार कोटी रुपयांची होईल उलाढाल
जलवाहतूक, मेट्रो रेल्वे, मोनो रेल्वे,उपनगरीय रेल्वे, सिटी बस वाहतूक या सर्वांना एकाच तिकीट सिस्टीमवर आणले जाईल. क्रुझ पर्यटनाच्या प्रकल्पांमधून सुमारे30 हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल. मुंबईचा जीडीपी वाढेल. त्यातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जीडीपी विकासामध्येही महत्त्वाची भर पडेल. मेट्रोच्या कामातून निघालेल्या डेब्रीजमधून रेक्लेमेशन तयार करण्यात येत आहे. मुंबईच्या विकास आराखड्यामध्येही याला मान्यता देण्यात आली असून या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
क्रुझ पर्यटनासाठी मुंबई महत्त्वाचे डेस्टिनेशन – नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, देशात आंतरराष्ट्रीय क्रुझमधून येत्या ५ वर्षात सुमारे ४० लाख परदेशी पर्यटक येणार आहेत. त्यापैकी ३२ लाख पर्यटक हे मुंबईत येतील. यातून ३० हजार कोटी रुपये इतके परकीय चलन आपल्याला मिळणार आहे. यातून सुमारे अडीच लाख नव्या रोजगारांची निर्मिती होईल. जगात क्रुझ पर्यटनाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून मुंबई हे त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. केंद्र शासन क्रुझ पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना देईल, असे त्यांनी सांगितले.
सागरमाला अंतर्गत महाराष्ट्रात २ लाख ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
सागरमाला अंतर्गत महाराष्ट्रात ११५ प्रकल्पांची कामे सुरु आहेत. यातून सुमारे २ लाख ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. यापैकी ८५ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. याशिवाय पायाभूत सुविधा निर्मितीची एकूण अंदाजे ७.५ लाख कोटी रुपयांची कामे महाराष्ट्रात केंद्र शासनामार्फत सुरु आहेत. मुंबईत लवकरच रो-रो सेवा, रो – पॅक्स सेवा सुरु करण्यात येणार आहे. मिथेनॉलवर चालणाऱ्या बसेस,फ्लोटींग रेस्टॉरंट, जलवाहतूक या सेवाही सुरु करीत आहोत. जलवाहतूक सेवा मुंबईकरांना वरदान ठरेल, असेही मंत्री श्री. गडकरी यावेळी म्हणाले.
लक्षवेधी मुद्दे –
- रोजगार आणि पर्यटनासाठी एक नवीन पर्व.
- 2017-18 मध्ये 1.6 लाखाहून अधिक क्रूझ पर्यटक आणि 139 क्रूझ जहाजांनीभारताला भेट दिली.
- 2028 पर्यंत पर्यटन आणि प्रवास क्षेत्रात 1 कोटी नोकऱ्यांची भर.
- देशासाठी परकीय चलनाची कमाई.
- रोजगार- गुंतवणुकीच्या प्रमाणात अधिक वाढ.
- नोकरी आणि व्यवसायाच्या संधीत वाढ.
- स्थानिक अर्थव्यवस्थेला लाभ.
- स्थानिक/प्रादेशिक संस्कृती अधिक लोकांपर्यंत पोहचेल.
क्रूझ टर्मिनल – प्रमुख वैशिष्ट्ये :
- 1.75 हेक्टर क्षेत्र.
- बर्थची लांबी 270 मीटर.
- आसन क्षेत्रासह प्रोमेनेड,बाग व लॉन्स.
- सोयीस्कर पर्यटक सुविधा- चेक इन-चेक आउट, सोयीस्कर पार्किंग व सामान हाताळणी आणि स्कॅनिंग.