महाराष्ट्र

पुणे- ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या पदवीप्रदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्र देऊन गौरव

वास्तुविशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक नगर निर्मितीसाठी योगदान देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पुणे, दि. 20 : मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत असताना शहरांचा नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे आहे. सध्या तापमानवाढीचे मोठे संकट आपल्यासमोर आहे. यासाठी वास्तुविशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा विचार करुन, उत्कृष्ट दर्जाच्या नगर निर्मितीसाठी योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सतीश मिसाळ एज्युकेशन फाऊंडेशनच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर, उंड्री या संस्थेचा पहिला पदवीप्रदान समारंभ मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याहस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, महापौर मुक्ता टिळक,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु नितीन करमळकर, संस्थेच्या विश्वस्त आमदार माधुरी मिसाळ,कार्यकारी संचालक पूजा मिसाळ,दीपक मिसाळ, प्राचार्या पूर्वा केसकर आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘थेसीस कॅटलॉग’चे प्रकाशन श्री.फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पदवी संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री श्री.फडणवीस  म्हणाले,इतक्या कमी वेळेत आणि कमी काळात ब्रिक एज्युकेशन संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात चांगले नाव कमाविले आहे, हे कौतुकास्पद आहे.

नगर नियोजनात शाश्वत विकासाचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, जगातलं सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र भारतात तयार झालं आहे. हडप्पा आणि मोहंजोदडोसारखी सुनियोजित शहरे ही प्राचीन काळातील उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राची उदाहरणे आहेत. सध्या नगररचना नियोजनाची पर्यायाने अधिक नगररचनाकारांची आवश्यकता आहे. देशाची निर्मिती व बांधणीमध्ये या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे व दर्जेदार मानव संसाधन निर्माण करावे.

 

एकविसावे शतक सर्वोत्तम गुणवत्तेचे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी सामान्य दर्जाचे न राहता अधिकाधिक ज्ञान ग्रहण करुन समाजाला उत्कृष्ट सेवा पुरवावी. देशाचा विकास झपाट्याने होत असताना विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानरुपी अश्वावर स्वार होणे आवश्यक आहे, असे सांगितले. आपल्याला समाजाकडून जे मिळते,ते समाजाचं देणं असतं. आपल्या कार्यकर्तृत्वातून विद्यार्थ्यांनी समाजाला परत देण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी यावेळी केले.

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, संस्थेच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. तरुणांनी नवनवी आव्हानं पेलून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. आव्हानांना सामोरं जाताना अपयश आलं तरीही विद्यार्थ्यांनी खचून न जाता धैर्याने यशस्वी वाटचाल करावी. आर्किटेक्टचे विद्यार्थी म्हणजे नवनव्या संकल्पना मांडून त्या साकार करण्याची क्षमता असणारे विद्यार्थी असतात. आपल्या संकल्पना मूर्त स्वरुपात आणून देशाच्या निर्मितीमध्ये योगदान द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकातून पूजा मिसाळ यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. प्राचार्या पूर्वा केसकर यांनी आभार मानले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर,आमदार संजय भेगडे, आमदार योगेश टिळेकर तसेच लोकप्रतिनिधी,शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी,पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!