प्रासंगिक लेख

परतीचा पाऊस

     जून जुलै मध्ये तुफान कोसळणारा हा पाऊस श्रावण सुरू झाला की आपला वेगही मंदावतो आणि तीव्रताही. मग सुरू होतो ऊनपावसाचा लपंडाव या लपंडावामुळे निसर्गाचे अदभूत, विलोभनीय असे रूप आपल्याला पाहायला मिळते. याचवेळी आपले सण सुरू होतात. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. यानंतर येतात गणेशोत्सवाचे दिवस…उत्साहाने भरलेले आणि भक्तीने भारलेले. त्यानंतर महालय सुरू होते घरोघरी. आणि नंतर येतात ते हस्त नक्षत्राचे दिवस… मुलींसाठी हादगा सुरू होतो याचबरोबर घटस्थापना होऊन  नवरात्रीचे दिवसही याच दरम्यान सुरू होत असतात. पुन्हा एकदा तुफान पाऊस सुरू होतो अगदी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह…हाच हा परतीचा पाऊस.
     या पावसाने सर्वांची तारांबळ उडते कारण निरभ्र असलेले आकाश पाहता पाहता क्षणात भरून येते आणि ढग-विजांचे ढोल नगारे सुरू होत वादळी वारा वाहू लागतो आणि सुरू होते पावसाला. आम्ही लहान असताना मोठी माणसे म्हणत की हा पाऊस एकदा का माळेत अडकला(घटस्थापनेला जो घट बसवलेला असतो त्याला रोज एक फुलांची माळ घालायची पद्धत आहे) की नऊ दिवस…दसरा होईपर्यंत पडतोच. त्यावेळी तसा तो पडायचादेखील त्यामुळे मोठ्यांचे म्हणणे पटायचे. पण आता तसा पाऊस पडत नाही ग्लोबल वॉर्मिंगवर खापर फोडून आपण मोकळे. परंतु हे कोणामुळे उद्भवले याचा आपल्याला विचार नको असतो….असो.
       तर अशा या परतीच्या पावसाच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत तशाच आताच्याही आहेत. त्यातील एक दोन कधीही न विसरणाऱ्या एक मी १०वीत असतानाची आणि दुसरी दोन तीन वर्षांपूर्वीची.
    तेव्हा मी १०वीत होते. आम्ही कागलमध्ये राहत होतो.(आजही आई कागललाच असते मी मात्र लग्न झाल्यानंतर पहिले ठाणे आणि आता नवी मुंबईत स्थायिक झाले). माझी १०वीची सहामाही परीक्षा सुरू होती. शेवटचा काॅमर्सचा पेपर होता. फक्त ९वी, १०वीलाच फक्त हा विषय असल्यामुळे थोडेच विद्यार्थी शाळेत. पेपर ३ ते ६ या वेळेत होता. दुपारी घरातून निघताना स्वच्छ ऊन पडले होते. पण जसा पेपर सुरू झाला. आकाश काळ्या ढगांनी भरून आले. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. थोड्यावेळाने तो थांबला अन् पाऊस सुरू झाला. मी भिजणार म्हणून आईने भाऊला(तेव्हा तो ८वीत होता) मला घेऊन येण्यासाठी पाठवले कारण अक्का व दादा कोल्हापूरला काॅलेजला गेले होते ते अजून आले नव्हते. भाऊ माझ्या पेपर संपण्याची वाट पाहत उभा होता. पावसाने आता मात्र चांगलीच दमदार सुरूवात केली. पेपर लिहून संपल्याबरोबर ६ वाजण्याची वाट न पाहता मी बाहेर पडले कारण भाऊ न्यायला आला आहे हे आधीच सरांनी मला सांगितले होते. बाहेर पडण्याच्या दरवाज्यात गुडघाभर पाणी साचले होते ..नेमका अंदाजच लागत नव्हता पाण्याचा. पटांगणावरून यायचे तर तिकडे सगळा चिखल झाला होता. लाल माती असल्यामुळे पडायची भिती होती. मग मी अन् भाऊने एकमेकांना घट्ट पकडून शाळा असलेल्या या वाड्याच्या मोठ्या दरवाजातूनच जायचे ठरवून अंदाज घेत तेथून सावकाश बाहेर पडलो. बाजारपेठेत आलो पाऊस सुरू होताच पण रस्त्यावर पाणी नव्हते. हायसे वाटले आणि दोघे चालू लागलो. पण पुढे काय वाढले होते दोघांनाही कल्पना नव्हती.
     गैबी चौकात आलो आणि मुख्य रस्त्याने चालू लागलो. जसजसे पुढे जात होतो रस्त्यावरचे पाणी वाढत होते. कारण शाळा, बाजारपेठ उंचावर होती आणि हा उतार होता गावातील वरच्या भागांतील पाणी सर्व याच भागात येत होते. भाऊ अन् मी जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या मधूनच चालायचा प्रयत्न करत होतो पण पाण्याला एवढी ओढ होती की आम्ही कडेलाच पुनःपुन्हा खेचलो जायचो.रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी खोल गटारे होती…त्यामुळे ती भिती जास्त होती. बाजारपेठ असल्यामुळे दुतर्फा दुकाने होती. कुठे थांबायचे कळतही नव्हते तसेच हळूहळू एकमेकांना सांभाळत निघालो होतो. कोणी मदतीलाही येत नव्हते आणि कोणी ती करावी असे मनातही येत नव्हते. आता मात्र पाणी खूपच वाढले गुढघ्याच्या वर आले पाय पुढे टाकायलाही येत नव्हते, काय करावे कळत नव्हते. कागल बॅंकेच्याजवळ पोहोचलो आणि बाजूच्या एका लहान दुकानातील चाचा आमच्याजवळ आले. त्यांनी आम्हा दोघांना आपल्या दुकानात नेले. प्यायला पाणी दिले कारण भितीने घसा कोरडा पडला होता, तोंडातून शब्द ही बाहेर पडत नव्हता. दोघेही गारठून गेलो होतो, छत्री असली तरी पाऊस कसाही पडत असल्यामुळे दोघेही भिजलो होतो. चाचीनी लगेच गरमागरम चहा दिला तो पिल्यावर थोडे सावरलो. पाऊस थांबायचे नावच घेत नव्हता. आई काळजी करत असणार, हेही जाणवत होते.
    एक तास तिथेच बसून होतो. अंधार पडला पाऊस कमी झाला होता पण पाणी उतरत नव्हते. चाचा तर जाऊ देत नव्हते कोणीतरी घरचे येऊ दे मग जा..असे म्हणत होते. थोडा वेळ गेला पाणीही आता ओसरले होते तेवढ्यात दादा आणि अक्का दोघेही येताना दिसले. चाचांनी त्यांना दुकानात बोलावले. त्यांना पाहून आतापर्यंत धीर करून अडवलेले अश्रू नकळत वाहू लागले. मग आम्ही चौघेही घरी आलो आम्हाला पाहताच आईच्या जीवात जीव आला. आम्ही घडलेले सर्व तिला आणि आबांना सांगितले. दोघांनीही त्या देवमाणसांचे(चाचा,चाची) आभार मानले. आई तर तिथेच नेहमी बांगड्या भरायला जात असे. दुसऱ्या दिवशी आईआबा दोघेही चाचा-चाची यांना प्रत्यक्ष जाऊन आभार मानून आले.
आजही तो पाऊस अन् ती संध्याकाळ जशीच्या तशी आठवते…मनात एक अनामिक भिती येते. जर त्यादिवशी चाचांनी आम्हाला घरी नेले नसते तर….????पुढचा विचारही करवत नाही….
     यानंतरची आठवण दोन-तीन वर्षांपूर्वीची…नवरात्रीचे दिवस….मी, माझी मुलगी गुड्डू, आणि मावस बहीण अशा तिघी वाशीला देवीच्या दर्शनाला गेलो होतो. जाताना आकाश अगदी स्वच्छ. वाशीतून आलो आणि कोपरखैरणेतील गावदेवी रांजनदेवीचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडलो आणि सोसाट्याचा वारा आणि ढग-विजांचा गडगडाट सुरू झाला. गेले वीस वर्ष मी इकडे राहत होते पण असा वादळी वारा याआधी कधीच अनुभवला नव्हता. झाडे तर अशी हालत होती की कधी पडतील सांगता येत नव्हते, काही तर धारातीर्थीही  झाली होती. रस्त्यावर झाडांच्या फांद्या मोडून पडल्या होत्या. घराच्या अगदी जवळ आलो होतो…समोर आमची सोसायटी दिसत होती पण पाऊस मुसळधार पडत होता, या गडबडीत माझे चप्पलही तुटले होते चालताना एका फांदीत पाय अडकल्याने. पाऊस पडत असल्यामुळे एका दुकानाच्या पायरीवर मी, गुड्डू आणि बहीण तिघीही थांबलो होतो, पाऊस कमी होण्याची वाट पाहत होतो. तेव्हढ्यात कडकड असा आवाज आला. कसला आवाज येतो आहे हे पाहत असतानाच समोरच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या झाडाची मोठी फांदी अगदी माझ्या पायात येऊन पडली. त्या फांदीच्या शेंड्याची पाने पायाला लागत होती. एक दोन इंच जरी मी पुढे उभी असते तर ती फांदी माझ्या अंगावरच पडली असती. आम्ही तिघीही घाबरलो. दुकानदार आम्हाला आत बोलावू लागला. आता मात्र मी ठरवले आणि गुड्डू व बहिणीला म्हणाले, ‘चला, इथे जीव धोक्यात घालून उभे राहण्यापेक्षा थोडे भिजलो तरी चालेल पण घरी जाऊ.’ आणि एका हातात गुड्डूचा हात पकडून आणि दुसऱ्या हातात तुटलेली चप्पल घेऊन मी अनवाणी पायानी त्या रस्त्यात फांद्यांच्या पडलेल्या खच मधून वाट काढत …अनवाणी चालायची सवय नसल्याने पायाला फांद्या, काट्या, खडे टोचत होते तरी त्याकडे माझे लक्षच नव्हते कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. ..आणि सुखरूप घरी पोचलो. हा प्रसंग दरवर्षी नवरात्रीला देवीच्या दर्शनाला गेलो की डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो….असा हा परतीचा पाऊस.
     असे जरी हे त्याचे भयावह रूप पाहिले आणि अनुभवले असले तरी कवी मन स्वस्थ बसत नाही. यातूनही या मनाला धरती आणि पावसाच्या नात्यातील गोडवा आणि दुरावाच दिसतो आणि नकळत माझ्या लेखणीतून कविता अवतरते.
परतीचा पाऊस आला 
सर्वदूर मृदगंध दरवळला,
धरणीही आतुर भेटीला 
शेवटच्या पाऊस सरीला…
साजन जाई दूरदेशाला
सोडून जसा सजनीला,
वियोगाच्या अव्यक्त घडीला
भेट आपल्या प्रियेला…
वळूनी पाहे धरणीला 
जात पुन्हा रेंगाळला,
विरही विजेने गहिवरला
गडाडत मग धुंद बरसला…
सौ. ज्योती शंकर जाधव,
कोपरखैरणे, नवी मुंबई.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!