
मुंबई : बॅगेच्या दुकानाचे टाळे तोडून 1 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. ही उत्तम कारवाई पायधुनी पोलिसांनी केली असून, या टोळीतील चौघांना 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अब्दुल रहमान इस्टेट येथे बॅगेचे दुकान आहे. 14 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी बॅगेच्या दुकानाचे टाळे तोडले. या दुकानातील स्कूल, कॉलेज बॅग व सॅग अशा एकूण 580 बॅगा 10 गोण्यांमध्ये बांधून ठेवल्या व दुकानाचे शेटर बंद करून गेले. रात्रीच्या वेळी पायधुनी परिसरात पोलिसांची गस्त असल्याने चोरटे दुसऱ्या दिवशी रविवारी सकळी 8 च्या सुमारास पुन्हा दुकानात आले व बॅगा भरलेल्या 10 गोण्या व 10 हजार रुपये रोकड घेऊन गेले.
दरम्यान, सोमवारी सदर चोरीची घटना उघडकीस आली. या प्रकरणी (गु. र. क्र. 253/18) भादंवि कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी 22 ऑक्टोबर 2018 रोजी मोहम्मद तारिक अब्दुल रहमान शेख (24), मोहम्मद हारुन मुश्ताकअली शेख (27), सुभानअली अब्दुल रहेमान शेख (35), राजू रब्बुल शेख (25) यांच्या मुसक्या आवळल्या. या चोरट्यांकडून चोरीचा काही मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांना न्यायालयाने 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून उर्वरित चोरीचा मुद्देमालचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बॅग चोरट्यांच्या टोळीला परिमंडळ 2 चे उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव, वपोनि अविनाश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि (गुन्हे) विजयसिंह भोसले, गुन्हे प्रकटीकरणचे पोउनि लिलाधर पाटील, पोउनि प्रवीण फडतरे, हवालदार (बक्कल नं. 23080) सोलकर, पोना (बक्कल नं. 32004) दळवी, पोना (बक्कल नं. 971010) सावंत, पोना (बक्कल नं. 060260) माने, पोना (010682) सूर्यवंशी, पोशि (बक्कल नं. 092092) शिंदे, पोशि (बक्कल नं. 081042) ठाकूर आदी पोलीस पथकाने अटक करण्यात उत्तम कामगिरी केली.