संपादकीय

मी टू चे सर्वत्र वादळ

भारतीय समाजात कधी नव्हे ते ‘मी टू’ चे वादळ घोंघावत असून, या वादळात अनेकांचा बळी जाणार असल्याची भाषा देखील एकीकडे सुरू झाली असतानाच अनेकांना याचा त्रास झाला.अनेकांना होण्याची शक्यता नाकारण्यासारखी नाही.सिनेमाचे आणि राजकारणाचे जग हे अतिशय ग्लँमरस आहे.हे कोणी सांगायला ज्योतीषाची गरज नाही.मात्र भारतीय संस्कृतीची लक्तरे वेशीवर…!अशीच काहीशी स्थिती दिसते.मात्र हजारो वर्षांपासून अन्याय अत्याचार मुकाटयाने सहन करणारी भारतीय महिला. चार भिंतीत असेल किंवा घराबाहेर असेल, अत्याचाराचे चटके सोसत असे. मात्र या शोषणाविरोधात आता भारतीय महिला आपल्या विरोधात झालेला अन्याय अत्याचार ‘मी टू’ च्या माध्यमातून मांडू पाहत आहेत.यामुळे काहींना न्याय मिळेल यात शंकाच नाही. काही वर्षांपूर्वी आपले लैंगिक शोषण झाले आहे, म्हणून तक्रार करण्यास घाबरणारी हीच महिला, तक्रार केल्यास समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काय असेल? याची भीती वाटणारी ही महिला, आज आपल्यावर अन्याय झाला, आपले लैंगिक शोषण झाले, याची जेव्हा तक्रार करते, तेव्हा भारतीय समाजातील ही एक क्रांतीच म्हणावी लागेल.उशिरा का होईना पण एक महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे.त्यामुळे या निर्णयाचे स्वागत व्हायला काहीच हरकत नाही.

       ‘मी टू’ चे वादळ आज घोंघावत असले तरी, ही चळवळ सर्वप्रथम ट्विटरवर सुरू झाली. ट्विटर संकेत स्थळावर जरी आलीस मिलानो हिने मी टू चा वापर प्रचलित केला असला तरी हे शब्द लैंगिक शोषणासंदर्भात वापरण्याचे श्रेय तराना बर्क या स्त्री हक्क कार्यकर्तीला जाते. १९९७ साली एका तेरा वर्षाच्या लैंगिक शोषणाची शिकार बनलेल्या मुलीशी बोलत होत्या. तिला कसा प्रतिसाद द्यावा हेच मला सुचत नव्हते. ‘मी सुद्धा’ अशा अत्याचाराची शिकार आहे हे सुद्धा मी तिला सांगू शकले नाही. अनेक वर्ष हा प्रसंग माझ्या मनात घर करून राहिला. या संभाषणानंतर १० वर्षांनी तराना बर्क यांनी ’जस्ट बी’ या ना-नफा संस्थेची स्थापना केली. लैंगिक अत्याचाराची आणि हिंसेची शिकार बनलेल्या स्त्रियांच्या मदतीसाठी हि संस्था काम करते. तराना यांनी या चळवळीला नाव दिले ‘मी टू’. त्यानंतर भारतात तनुश्री दत्ताने आपल्यावर अन्याय झाला, आपले शोषण करण्याचा प्रयत्न बॉलीवूडमध्ये झाल्याचा आरोप केला. हा आरोप करतेवेळी तनुश्री दत्ताने थेट नाना पाटेकर यांचे नाव घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नानाचे सामाजिक श्रेत्रातील योगदान बघता नाना वर हे कसले तरी बालंट आहे, नाना असा वागूच शकत नाही, असा पावित्रा अनेकांनी घेत न्यायदान करण्याचा प्रयत्न केला.आता याता नाना अडकतात की सुटतात याकडे सर्वाचेच लक्ष लागून आहे. राज्य महिला आयोगाकडूनही नानाना नोटीस बजावली आहे. वास्तविक या बाबी न्यायालयीन बाबी असल्यामुळे न्यायदान करण्याचे काम हे न्यायालयाचे आहे. त्यामुळे कोण दोषी आणि कोण आरोपी या निकाल न्यायालय देईनच.
         राज्य महिला आयोगानेही अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेले लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांची दखल घेत पाटेकर यांच्यासह सामी सिद्दीकी, गणेश आचार्य आणि राकेश सारंग यांना नोटीस बजावली आहे. याचप्रमाणे ‘सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ला (सिंटा) लैंगिक गैरवर्तनासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. लेखिका विनता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. यात त्यांनी आलोक नाथ यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता तरी तसे थेट संकेत त्यांनी दिले होते. विनता यांच्या आरोपांवर आलोक नाथ यांनी असे स्पष्टीकरण दिले की, मी हे आरोप नाकारत नाही आणि स्वीकारतही नाही. मी या विषयावर अधिक बोलणार नाही, कारण तितकाच तो ताणला जाईल, असे ते म्हणाले.शेवटी नेमके काय घडले हे आरोप करणारी महिला व ज्याच्यावर आरोप झालेत या दोघांनाच माहीती.
               बॉलीवूड, क्रिकेट, मल्टीनॅशनल कंपन्यांचे सीईओ, यासह अनेकांवर आरोप होतांना दिसून येत आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर तर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे ‘मी टू’ चे वादळ काही लवकर शमण्याची चिन्हे नाहीत. असे असले तरी या ‘मी टू’ च्या वादळात अनेकांचा बळी जाण्याची शक्यता नाकारण्यासारखी नाही.शेवटी आपण इतके म्हणू शकतो कर नाही त्याला डर कशाला?जे काय व्हायचे ते होऊन जाऊ दे.या मी टू मोहिमेचा भविष्यकाळीन एक फारयदा मात्र होणार तो म्हणजे यापुढे पुरुष आपल्या कार्यालयातील,समाजातील महिलांशी बोलताना,वागताना शंभर वेळा विचार करेल यात शंका नाही.मात्र फक्त ही मोहीम राबवून चालण्यासारखे तर प्रत्येकांने प्रत्येक महिलेचा सन्मानही करायला हवा.नव्हे ती काळाची गरजच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही….!

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!