मुंबई : सोनसाखळी पळवणाऱ्य अट्टल चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही धडाकेबाज कारवाई परिमंडळ 7 मधील विशेष पथकाने ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीत जाऊन केली. हा चोरट्याविरुद्ध मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये 50 हून अधिक गुन्हे दाखल असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता विशेष पथकातील नोडल अधिकारी पोनि (गुन्हे) प्रताप भोसले यांनी दिली.
दिवसागणिक वाढणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी परिमंडळ 7 चे उपायुक्त अखिलेशकुमार सिंह यांनी सोनसाखळी चोरट्यांची यादी तयार केली. या यादीत तब्बल 25 मोस्ट वॉनटेड चोरट्यांनी नावे नमूद होती. या चोरट्यांना तुरुंगात धाडण्यासाठी उपायुक्त अखिलेशकुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ 7 च्या हद्दीतीस पोलीस ठाण्यातील 12 पोलीस निरीक्षक (गुन्हे) व 30 ते 40 अंमलदारांची निवड करण्यात आली.
हे विशेष पथक ऐरोली टोलनाका, आनंद टोलनाका, मॉडेल चेकनाका आदी ठिकाणी नाकाबंदी केली. विशेष करून दुचाकीस्वारांची चौकशी केली. तपासाचा दुसरा टप्पा म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी व आंबिवली परिसरात रात्रीच्या वेळी कोंबिग ऑपरेश सुरू केला.
23 ऑक्टोबर 2018 रोजी या विशेष पथकाने सहाय्यक पोलीस आयुक्त डी. सोंडे, नोडल अधिकारी नवघर पोलीस ठाण्याचे पोनि (गुन्हे) प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक आंबिवली येथील ईराणी वस्तीत कोंबिग ऑपरेशनसाठी गेले असता फिरोज सरवर ईराणी (52) पोलिसांच्या हाती लागला. त्याचा ताबा पंतनगर पोलिसांनी घेऊन (गु. र. क्र. 173/18) भादंवि कलम 420, 34 नुसार दाखल गुन्ह्यात अटक केली. 24 ऑक्टोबर रोजी ईराणी याला न्यायालयात हजर केले असता 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ईराणी याच्या विरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 50 हून अधिक सोनसाखळी चोरी, बॅंक व्यवहारात फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे.