भारत महाराष्ट्र

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण बचतगटांच्या महिला निघाल्या अमेरीकेला…

 वारली उत्पादने, हस्तकलांचे होणार अमेरीकेत प्रदर्शन

 जागतिक स्तरावरील उद्योजकतेचीही घेणार माहिती

मुंबई, दि. २७ : ग्रामीण बचतगटांच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तुंचे आता थेट अमेरीकेत प्रदर्शन होणार आहे. यात विशेष करुन वारली उत्पादने,हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची वैशिष्ट्यं असलेली वस्त्र उत्पादने,खाद्यसंस्कृती, हातमाग आदींचा समावेश असेल. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण बचतगटांच्या महिलांचा समूह अमेरीकेला चालला असून या महिला तेथील एमआयटी, स्टँडफोर्ट विद्यापीठ, टीआयई चार्टर,फेसबुकसारख्या विविध नामवंत संस्थांना भेटी देऊन जागतिक स्तरावरील उद्योजकतेचीही माहिती घेणार आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) मार्फत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला,फिक्कीचे अतिरिक्त संचालक रुबाब सूद, बचतगट प्रतिनिधी विमल जाधव, राजश्री राडे, अनिता सोनवणे,संगिता गायकवाड यांचा समावेश आहे. हा समुह अमेरीकेतील बोस्टन,न्युयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को या शहरांना भेटी देणार आहे.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की,राज्यातील बचतगटाची चळवळ ही आता फक्त बचतीपुरती मर्यादित राहिली नसून या चळवळीतून अनेक महिला लघुउद्योजक पुढे येत आहेत. अनेक महिला बचतगट वेगवेगळ्या प्रकारचे लघुउद्योग यशस्वीरीत्या चालवित आहेत. त्यापैकी १०० बचतगटांच्या उद्योजकतेला आम्ही महाअस्मिता नाविन्यपूर्ण उपजिविकी गतीवर्धन कार्यक्रमातून (मीलाप) चालना देत आहोत. या लघुउद्योजक महिला बचतगटांना उद्योजकतेचे आधुनिक प्रशिक्षण देणे, त्यांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेची माहिती करुन देणे अशी काही मीलाप अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. या अभियानांतर्गत फिक्कीच्या सहयोगाने अमेरीका दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हा समूह अमेरीकेतील बोस्टन,न्युयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को या शहरांना भेटी देणार आहे. तेथील एमआयटी,स्टँडफोर्ट विद्यापीठ, फेसबुक आदी संस्थांना हा समूह भेटी देणार आहे. तेथील लघुउद्योग क्षेत्रातील यशस्वी आणि प्रभावी व्यक्ती, संशोधक,गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील धोरणकर्ते, टीआयई चार्टरचे सदस्य यांच्या भेटी घेऊन लघुउद्योग आणि गुंतवणूक याबाबतीत चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने,महाराष्ट्राची वैशिष्ट्यं असलेली वस्त्र उत्पादने, इथली खाद्यसंस्कृती,हातमाग उत्पादने आदींविषयक अमेरीकेतील नागरीकांना विशेष आकर्षण आहे. याचा उपयोग महाराष्ट्रातील बचतगटांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी कशा पद्धतीने करता येईल याविषयी या दौऱ्यात आदान – प्रदान आणि चर्चा केली जाणार आहे. दोऱ्यासाठी हा समुह आज अमेरीकेकडे रवाना होत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!