ठाणे

डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा.. मृतांच्या नातेवाईकांना ५  लाख आणि नोकरी देण्याची मागणी 

डोंबिवली : –   शुक्रवारी २६ ऑक्टोबर २०१८ रोजी एमआयडीसीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ३ कामगारांचा हकनाक बळी गेला आहे. मॅनहोल साफ करण्यासाठी उतरलेल्या घनश्याम कोरी (४०), देविदास पाचगे (३६) आणि महादेव झोपे ( ४०) या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. या घटनेला ७२ तास उलटूनही एमआयडीसी प्रशासनाने दुर्दैवी कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी कोणतीही हालचाल केली नाही. शिवाय या मृत्यूकांडाला सर्वस्वी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत मनसेने एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला.
    मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्षा मंदा पाटील,राहूल कामत, कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उजैनकर, मनविसेचे शहराध्यक्ष सागर जेधे, आदी पदाधिकारी आणि मनसैनिकांनी सोमवारी दुपारी एमआयडीसीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. हे तिघे कामगार ज्यावेळी मॅनहोलच्या सफाईसाठी आत उतरले, त्यावेळी हातमोजे, गमबूट, तोंडाला लावण्याचे ऑक्सिजन सिलिंडरसह असलेला गॅस मास्क, इमजरन्सी लाईट, जनरेटर, फॅन, सेफ्टी बेल्ट अशा कुठल्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपयोजना करण्यात आल्या नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे सदर चेंबरमध्ये येणाऱ्या सांडपाण्याच्या वाहिनीतील पाणी बंद करणे, काम करण्याच्या चेंबरमधील जागा सुकी झाल्यानंतर त्या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी फॅनचा वापर करून अशा अशा स्थितीत चेंबरमधील भाग साफसफाई करणे आवश्यक आहे, असे अभियांत्रिकी कार्यवाहीमध्ये नमूद असतानाही दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करण्यात एमआयडीसी प्रशासन असमर्थ ठरले असल्याचा मनसेने आरोप केला. विशेष म्हणजे हे तिन्ही कामगार अकुशल जरी होते तरी हातावर पोट भरणारे गरीब कुटुंबातील आहेत. या दुर्घटनेला आणि या कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधित कंत्राटदारावर पोलिसांनी फौजदारी कारवाई केली आहे. मात्र या सर्व मृत्यूकांडाला सर्वस्वी कारणीभूत असलेल्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना विनाविलंब निलंबित करण्यात यावे, त्यांची वेतनवृद्धी आणि पदोन्ननीती तात्काळ थांबविण्यात यावी, मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लक्ष रूपये विनाविलंब देण्यात यावे. तसेच या सर्व मागण्यांची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर आम्हाला पुराव्यांनिशी सविस्तर अहवाल द्यावा. ही सर्व कार्यवाही दिपावलीपूर्वी करण्यात यावी. अन्यथा ऐन दिवाळीत एमआयडीसीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपस्थित शिष्टमंडळाने दिला. कामगारांच्या या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत मनसेने एमआयडीसीचे कार्यालय डोक्यावर घेतले. एसी केबिन आणि गाड्यांमधून फिरणाऱ्यांनीच निष्पाप मजूरांचा बळी घेतला आहे. त्यामुळे मृतांच्या नातलगांना प्रत्येकी ५  लाख आणि एकाला नोकरी द्या, अशी मागणी मनसेने या पार्श्वभूमीवर बोलताना केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!