मुंबई, दि. 29 : यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांच्या 40 वर्षांच्या संगीत साधनेचा राज्यातील 11 कोटी जनतेच्या वतीने करण्यात आलेला सन्मान असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा 2018- 19 सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना गत वर्षीच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारप्राप्त गायिका पुष्पा पागधरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, शाल, मानपत्र,मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी बृन्हमुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या, राजकुमार बडजात्या, जेष्ठ गायक उदित नारायण, सुरेश वाडकर,बेला शेंडे, संगीतकार अशोक पत्की,सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विकास थोरात, संचालक स्वाती काळे, विजय पाटील यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, विजय पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याचा मनापासून आनंद झाला. त्यांच्या संगीत साधनेचे स्पिरिट वाखाणण्याजोगे आहे. आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांनी ‘राम लक्ष्मण’ हे नाव कायम ठेवले. केवळ संगीतकार म्हणून नव्हे,तर ‘माणूस’ म्हणून ते खूप मोठे असल्याचे गौरवोद्गार श्री. तावडे यांनी काढले.
दरम्यान, विजय पाटील यांच्या जीवनावर आधारित एक ध्वनिचित्रफित यावेळी दाखविण्यात आली.