अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्या मुंबईत शुभारंभ..
मुंबई, दि. 29 : आहाराची सकसता वाढविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिलांमधील अॅनिमियाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने रास्त भाव दुकानातून शिधापत्रिकेवर‘लोह आणि आयोडिनयुक्त’(डबल फोर्टीफाईड) मीठ वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतर्गत मुंबइ येथे या मीठ वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या बुधवार दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे. हा कार्यक्रम अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि उद्योग व खनिकर्ममंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम चित्पावन ब्राह्मण संघ सभागृह, श.वि. सोवनी पथ, गिरगाव, मुंबई-400004 येथे होणार आहे.
सध्या शिधापत्रिकेवर रास्त दरात गहू,तांदूळ आणि तूर डाळ देण्यात येते. सध्या दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड 1 किलो प्रतिकिलो रु. 20/- या दराने साखर वाटप करण्यात येत आहे. तर,प्रति कार्ड 1 किलो चणाडाळ व एक किलो उडीदडाळ किंवा दोन्हीपैकी कोणतीही एक डाळ 2 किलो,प्रतिकिलो रु. 35/- या दराने उपलब्ध होत आहे.