डोंबिवली :- डोंबिवलीजवळ असलेल्या कोपर रेल्वे स्थानकाची गर्दी वाढत असल्याने एकमेव असलेला पूल अरुंद असल्याने तो रुंद करावा अशी मागणी शिवसेनेने केली होती. शिवसेनेच्या या प्रयत्नाला यश आले आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीला पाठिंबा देत पुलाची रुंदी वाढवणे व होम प्लेटफार्म बांधावा म्हणून १ कोटी रुपये खर्च मंजूर केले आहे. या नवीन होम प्लटफॉर्मचे भूमिपूजन कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापौर विनिता राणे, स्थायी समितीचे माजी सभापती तथा जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, नगरसेवक विश्वनाथ राणे, परिवहन समितीचे सदस्य संजय पावशे,तालुकाप्रमुख एकनाथ पाटील,संतोष चव्हाण ,किरण मोंडकर , स्वाती मोहिते, अनिता ठक्कर, गणेश सरवणकर आदी उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे कोपर येथील रेल्वे प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मची दिवाळी भेट मिळणार आहे. खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळालेल्या या होम प्लॅटफॉर्मच्या कामाचे भूमिपूजन गुरुवार, १ नोव्हेंबर रोजी झाले. त्याचबरोबर अपर कोपरला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या रुंदीकरणालाही मंजुरी मिळाली असून त्याचेही काम सुरू होणार आहे.
ठाण्यापुढील प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ व्हावी, यासाठी खा. डॉ. शिंदे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच दिवा आणि ठाकुर्ली स्थानकांचा कायापालट झाला. अंबरनाथ स्थानकाच्या पुनर्विकासाला मंजुरी मिळाली आहे. कल्याण येथील रेल्वे यार्डाचे देखील रिमॉडेलिंग होऊन लांब पल्ल्याच्या व उपनगरी गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊन उपनगरी गाड्यांची संख्या वाढणार आहे. खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा ते अंबरनाथपर्यंतच्या सर्व स्थानकांवर अवघ्या पाच रुपयांत पिण्याचे शुद्ध थंड पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच, अपघातग्रस्त प्रवाशांसाठी कल्याण, डोंबिवली आणि मुंब्रा येथे वैद्यकीय कक्ष सुरू झाले असून कळवा येथील वैद्यकीय कक्षही लवकरच सुरू होत आहे.
ज्या स्थानकांमध्ये होम प्लॅटफॉर्म नाहीत, त्या स्थानकांमध्ये होम प्लॅटफॉर्म व्हावेत,जेणेकरून प्रवाशांना पादचारी पुलाचा वापर करावा लागणार नाही आणि पादचारी पुलांवरील गर्दीचा ताण कमी होईल, यासाठी खा. डॉ. शिंदे पाठपुरावा करत होते. त्यातूनच ठाकुर्ली येथे असा होम प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत दाखल देखील झाला. त्यापाठोपाठ अंबरनाथ आणि कोपर स्थानकातही होम प्लॅटफॉर्मला मंजुरी मिळाली असून कोपर स्थानकातील या कामाला गुरुवारपासून सुरुवात देखील झाली. गुरुवारी खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन झाले. या कामासाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून हा प्लॅटफॉर्म प्रवाशांच्या सेवेत दाखल व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मुंबई दिशेकडील पादचारी पुलाच्या कामालाही लवकरच सुरुवात
सध्या कोपर स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पुल नसल्यामुळे पूर्वेला राहाणारे प्रवासी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडून ये जा करतात. त्यामुळे मुंबई दिशेला पादचारी पुल व्हावा, यासाठीही पाठपुरावा सुरू होता. या पादचारी पुलालाही मंजुरी मिळून त्याचेही काम लवकरच सुरू होईल, असे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.