प्रासंगिक लेख

बोलून प्रेमबोल तू ………

“शब्दावाचुनी कळले सारे
शब्दांच्या पलीकडले”……
                         किती सुंदर अनुभूती आहे ना!!!…न बोलताच डोळ्यांतील भाव बरेच काही सांगून जातात. डोळ्यांतील भाव नि स्पर्शही न बोलता बरेच काही सांगून जात असतात. आईच्या डोळ्यांतील ममता आपल्याला न बोलताही जाणवते. बाबांच्या डोळ्यांचा धाक आपल्याला मर्यादेची जाणीव आणि आपण चुकलो आहोत हे न सांगताही दाखवून देतो. आपण जेव्हा दादा-ताईची एखादी वस्तू घेतो तेव्हा ते डोळे मोठे करून आपल्याकडे पहातात तेव्हा कळते की, ती वस्तू आपण घ्यायची नाही. शाळेतील शिक्षक-शिक्षिकाही न बोलता डोळ्यांनी बरेच काही सांगून जात असतात.
                       तसेच स्पर्शाचे आहे. लहान बाळाचा स्पर्श अगदी कोमल….आईचे ममत्व जागे करते. बाळ आपल्या आईला तिच्या स्पर्शानेच ओळखत असते. एखाद्या दुःखद प्रसंगी मित्र-मैत्रिणीनी खांद्यावर ठेवलेला हात न बोलताही खूप काही सांगून जातो. आईने डोक्यावरून, पाठीवरून प्रेमाने फिरवलेला हात माया, ममतेचे प्रतिकच आहे. अपयशामध्ये बाबांनी खांद्यावर ठेवलेला हात न खचता पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देणारा ठरतो. सासरी जाणारी लेक जेव्हा आई-बाबांना मिठी मारून रडत असते तेव्हा तिच्या पाठीवरून फिरणारे हात तिला सुखी रहा, आम्ही दूर असलो तरी तुझ्यासोबत कायम आहोत, हे सांगत असतात. आजारी माणसाला  त्याचा हात कोणी हातात घेतला तरी किंवा त्याच्या कपाळावर हात ठेवला तरी त्याला बरे वाटते, कोणीतरी आपल्या सोबत आहे,  असे वाटत रहाते. अशावेळी कोणीतरी सोबत असणेच खूप काही सांगून जाते.
                           पण प्रत्येकवेळी ही डोळ्यांची आणि स्पर्शाची भाषा पूर्णत्व सिद्ध करत नाही; बोलणे अत्यंत गरजेचे असते…. तिला शब्दांची जोड दिली तरच तिला पूर्णत्व प्राप्त होते. जसे की, बाळ आपल्याला ओळखते हे त्याच्या डोळ्यातून आपल्याला कळत असले तरी त्याने आपल्याला ‘आई’ अशी हाक मारावी, असे प्रत्येक आईला वाटत असते आणि त्या क्षणाची ती आतुरतेने वाट पहात असते. कधी कधी दोन  व्यक्तींच्या मनात गैरसमज निर्माण होतात तेव्हा एकमेकांशी बोलूनच हे गैरसमज दूर होत असतात. न बोलता राहिले तर अजून गैरसमज वाढून नातेच संपुष्टात येण्याचा धोका असतो…..हा उल्लेख इथे थोडा विचित्र वाटेल पण सत्य परिस्थितीच आहे ती….मरणाच्या दारात असलेली व्यक्ती तिच्या डोळ्यात काहीतरी सांगायची इच्छा आहे, असे इतरांना कळत असते, ते समजून घ्यायचा प्रयत्नसुद्धा करत असतात पण नेमके काय होते ते बोलायचे राहून गेल्यामुळे  मागे  एक दु:खमय हुरहूर राहून जाते……दोन मने एक झाली आहेत, दोघे एकमेकांना आवडत असतात हे त्या दोघानाही माहीत असते, दोघांच्याही ते डोळ्यात अगदी स्पष्ट दिसत असते.पण ते शब्द रुपात प्रकट होणे गरजेचे असते. ते जर तसे व्यक्त नाही झाले तर अशा अबोल, अव्यक्त राहिलेल्या प्रेमाच्या कळ्या न उमलताच निर्माल्य होऊन जातात आणि एक नको असलेले नाते घेऊन आयुष्यभर दोघेही ओढत नेतात….त्यामुळे डोळे, स्पर्श बरेच  काही सांगून जात असले तरी बोलणे, व्यक्त होणे ही तितकेच गरजेचे आहे, दोघांसाठी ही ……… .
“बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
लावून छंद वेडा केलेस विश्व धुंद”…..
सौ. ज्योती शंकर जाधव,
कोपरखैरणे, नवी मुंबई.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!