डोंबिवली : दिवाळी सुट्टीला शनिवारपासून प्ररंभ होत असून बच्चे कंपनी खेळासंदर्भात विविध योजना आखत आहेत. एकीकडे केडीएमसीचा तरण तलाव दुरस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे तर दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्रसिद्ध गोग्रासवाडीतील एकमेव उद्यानाला अवकळा आली आहे.
गोग्रासवाडी हा डोंबिवलीतील सर्वात जूना भाग आहे. दाट लोकवस्ती असल्याने सभोवताली राहणाऱ्या नागरिकांना मोकळी हवा मिळत नाही. यासाठी शिवसेनेच उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी खासदार अनिल देसाई यांच्या निधीतून हे उद्यान २०१५ मध्ये तयार केले. तीन वर्षातच या उद्यानाला अवकळा आली आहे. दुरुस्तीच्या नावाखााली उद्यानाचे काम तीन महिन्यांपासून काम बंद पडले आहे. स्थानिक तत्कालीन नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांच्या निधीतून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने हे उद्यान तयार केले. उद्यानात सुशोभित हिरवी झाडे लावण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी वॉकींग ट्रॅक तयार करण्यात आला होता. मध्यभागात खेळांसाठी जागा तयार करण्यात आली होती. तथापी आता सर्व झाडे तोडून टाकण्यात आली आहेत. उद्यानाला उध्वस्त धर्मशाळेसारखी स्वरूप प्राप्त झाले आहे. उद्यानात सर्वत्र कचरा, दगड, माती दिसत आहे. उद्यानातील सुदंर हिरवळ पाणी नसल्याने व तेथे पुरेसे लक्ष दिले जात नसल्यामुळे सुकुन गेली आहे. दिवस-रात्र उद्यान उघडे असते. तेथे कुणी पहारेकरी देखिल नाही. त्यामुळेच या उद्यानात अनेक गैरप्रकार होत असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक करत आहेत. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांना विचारले असता त्यांनी उद्यानासाठी राखून ठेवलेल्या जागेवर उद्यान व्हावे, म्हणून शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी १५ लाख रुपये निधी दिला. तर स्थानिक तत्कालीन नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांच्या निधीतून उद्यान तयार करण्यात आल्याचेही ते म्हणाले. उद्यानाची देख-भाल दुरुस्ती करण्याचे काम सुरु असून यासाठी निविदा काढली आहे. अजून निधी मंजूर करण्यात आला नाही. निधी मंजूर झाल्यावर कामाला प्रत्यक्षात सुरूवात होईल, असे केडीएमसीचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले.
उद्यानात तळीरामांचा त्रास…
विशेष खेदाची बाब म्हणजे रात्रीच्या वेळेत याच उद्यानात दारूच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याचे तेथील पडलेल्या बाटल्यांवरुन दिसून येते. ओल्या पार्ट्या झोडणाऱ्या महाभागांची दारूची झिंग चढल्यानंतर रात्रभर आरडाओरड चालते. वेळप्रसंगी हाणामाऱ्यांपर्यंत प्रकार घडतात. परिणामी उद्यानाच्या सभोवतालच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांची झोपमोड तर होतेच, शिवाय ऐकवणार नाही अश्या शब्दांत भांडण-तंटा करणाऱ्या सडकछाप गुंडांचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो.