डोंबिवली :- ( शंकर जाधव ) मुंबईतील धारावी येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्थानकात धिंगाणा घालत दोन पोलीस कर्मचाऱ्यांंला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात राडेबाज पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
महादेव कांबळे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मुंबई येथील धारावी नजीक असलेल्या पोलीस स्थानकात महादेव कांबळे हे पोलीस हवलदार पदावर कार्यरत असून ते कल्याण पूर्वेत राहतात. त्यांचे व त्याच्या पत्नीचा वाद झाल्याने ते दोघे रात्रीच्या सुमारास कोळशेवाडी पोलीस स्थानकात आले होते .याबाबत पोलीस कर्मचारी विजय कुराडे,शिशिर माने हे दोघे कांबळे यांच्याशी बोलत असताना कांबळे यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. विजय कुराडे, शिशिर माने या दोन्ही पोलीस कर्मचार्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र मद्यधुंद अवस्थेत असललेल्या कांबळे यांनी या दोघांना शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यानी मारहाण केली. या मारहाणीत दोघे पोलीस कर्मचार्यांना दुखापत झाली आहे तर पोलिसांनी मद्यपी राडेबाज पोलीस कर्मचारी महादेव कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.