डोंबिवली (शंकर जाधव) : दिवाळीला आपले सोन्याचे दागिने परत घेण्यासाठी गेलेल्या अनेक नागरिकांना डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सने फसविल्याचे उघडकीस आले आहे. सुमारे १५ कोटी रुपयाचा गंडा घालणाऱ्या प्रथमेश ज्वेलर्सने दुबईला गुंतवणूक केल्याची रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी विजयसिंग पवार माहिती दिली. लायसन्स नसताना बँकेप्रमाणे ठेवी घेऊन नागरिकांना फसविणारा या ज्वेलर्सचा मालक अजित कोठारी हा फरार आहे. त्याच्यावर फसवणुकीचा आणि अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
ज्वेलर्सचे मालक अजित कोठारी यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात पहिली तक्रार ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर ९ जणांनी कोठारी विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत.वपोनी विजयसिंग पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावर गेली १५ वर्षापासून असलेले प्रथमेश ज्वेलर्सने सोन्याचे दागिने ठेवी स्वरुपात घेणे सुरु केले. १० तोळे सोन्याचे दागिने आमच्याकडे ठेवा, १ वर्षानंतर १२ तोळे सोन्याचे दागिने परत करू असे अजित याने नागरिकांना सांगितल्यावर अनेक नागरिकांनी या आमिषाला भुलून सोन्याचे दागिने ज्वेलर्समध्ये ठेवले.दिवाळी जवळ आल्याने दागिने हवे असल्याने ज्यांनी दागिने ठेवले या ज्वेलर्स मध्ये ठेवले होते त्यांनी परत घेण्यासाठी गेले असता सदर ज्वेलर्सचे मालक अजित आपले दागिने घेऊन पसार झाल्याचे त्यांना समजले. अजित गेल्या तीन महिन्यापासून आपले दुकान बंद करून पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याने बदलापूर, वांगणी आणि डोंबिवली येथील रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केल्याचा तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे दुबईला कोणाकडे गुंतवणूक केली याचा शोध सुरु आहे.जनतेचे पैसे परत मिळावे म्हणून पोलिसांचे प्रयत्न सुरु आहे. प्रथमेश ज्वेलर्स व मालक यांच्यावर डोंबिवली पोलीस ठाण्यात भा.द. वि.४२० आणि ४०६ कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अशा प्रकारची अजून कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार देण्यासाठी तात्काळ डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे ०२५१-२८६०१०१ यावर संपर्क करावा अशी सूचना करणारे फलक प्रथमेश ज्वेलर्स दुकानावर लावले आहे.