अंबरनाथ : भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणे जिल्हयातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथील कापूरबावाडी, भिवंडी, विट्ठलवाडी, कळवा आदी ठिकाणी दिवाळीनिमित्त गोरगरीब माता भगिनींना साडी व मिठाई वाटप करून आगळीवेगळी भाऊबीज साजरी करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुंदर नंदलाल डांगे यांनी दिली.
भटके विमुक्त समाजातील लोकं नाका कामगार म्हणून जेथे बहुसंख्येने काम करतात. अशा ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी शहरामध्ये भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त गोरगरिबांना साडी व मिठाई वाटप करण्यात आली. आमचा कोणीच वाली नाही.परंतु, आपण आमचा केलेला सन्मान आम्ही विसरू शकत नाही. असे भावनिक विचार उपस्थित माता भगिनीनी व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थित माता भगिनी समोर आपले मनोगत व्यक्त करताना भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुंदर डांगे यांनी भटके विमुक्त समाज हा कष्टकरी असुन ज्यांच्यामुळे टोलेजंग इमारती उभ्या राहतात व शहराचे कायापालट होते. अशा माझ्या समाजबांधव व माता भगीनीचे आभार मानून त्याचा यथोचित आदर व्हावा या सामाजिक जाणिवेतून माता भगिनीना दिवाळीनिमित्त साडी व मिठाई वाटप करण्यात आल्याचे डांगे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजक शंकरसेठ पवार, वैदू समाजाचे येलगुरी शिर्के, बंजारा समाजाचे प्रसिद्ध गायक सुभाष राठोड, भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे नाशिक जिल्हा संघटक दिनेश जाधव, संस्थेचे सचिव मनीलाल डांगे, बाबू काका व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.