डोंबिवली:- ( शंकर जाधव ) सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत पुन्हा एकदा पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणिबाई व डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णायल्याच्या दुराव्स्थेचा विषय गाजला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी यावर आवाज उठविला असता प्रशासनाने यावर दोन्ही रुग्णालयांच्या सर्वांगीण दुरुस्तीसाठी नॅॅशनल अर्बन हेल्थ मिशनकडे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला असून तो अद्याप मंजूर झाले नसल्याचे सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याणच्या रुक्मिणिबाई व डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णायांची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे तर प्लास्टर पडून आतील शिगा दिसत आहेत त्यातच डाॅॅक्टरांची कमतरता असून प्रशासन रुग्णालयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. याबददल सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेना नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारुन दोन्ही रुग्णालयांची दुरुस्ती कधी करणार असा खडा सवाल केला शिवसेना नगरसेवकांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही रुग्णालयाच्या दुरावस्थेची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेच्या गंधारे प्रभागाच्या नगरसेविका शालिनी वायले यांनी आयत्यावेळचा विषय म्हणून रुक्मिणीबाई हाॅॅस्पीटलच्या दुर्दशेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. आपण स्वत:रुग्णालयात उपचारासाठी गेलो असता भिंतीतून रुग्णाच्या अंगावर पाणी पडत असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दोन्ही रुग्णालये एकत्र करुन अद्ययावत रुग्णालय उभारावे अशी सूचना केली.स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी प्रशासनाला निवेदन करण्याचे आदेश दिले. तेव्हा कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी सध्या तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत असून दोन्ही रुग्णालयांच्या सर्वांगीण दुरुस्तीसाठी नॅॅशनल अर्बन हेल्थ मिशनकडे दोन कोटीरुपयांचा प्रस्ताव पाठवला असून तो अद्याप मंजूर झालेला नाही. मात्र महापालिकेच्या आठमाहि बजेटमधून ही दुरुस्ती करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.