पनवेल : वाट चुकलेल्या 8 वर्षीय मुलाला सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ही उत्तम कामगिरी पनवेल लोहमार्ग पोलिसांनी केली. मुलगा परत मिळाल्याने मुलाच्या पित्याने पोलिसांचे आभार मानले.
11 नोव्हेंबर 2018 रोजी रात्रपाळीला कर्तव्यावर असलेले सहाय्याक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद, हवालदार (बक्कल नं. 1323) सुतार, पोलीस नाईक (बक्कल नं. 3351) मोरे हे पनवेल रेल्वेस्थानकात गस्त घालत होते. रात्री 12:05 वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक 2 – 3 वर 8 वर्षीय मुलगा एकटाच भेटला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून हवालदार (बक्कल नं.1446) गुजर, पोलीस शिपाई (बक्कल नं. 2562) देशमुख, पोलीस शिपाई (बक्कल नं 826) गरड यांनी तुर्भे परिसरात राहणाऱ्या कुलदीप वर्मा (35) यांचा शोध घेऊन मुलाला त्यांच्या ताब्यात दिले.
मुलगा परत मिळाल्याने आनंदी झालेल्या कुलदीप वर्मा यांनी पनवेल लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.