अंबरनाथ दि. २० (नवाज अब्दुलसत्तार वणू)
अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर मनिषा वाळेकर ह्या विराजमान होऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आज मंगळवारी शिवसेनेच्या नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर यांचा वर्षपूर्ती सोहळा पालिकेत साजराकरत सर्वपक्षीय गटनेत्यांनी त्यांचे अभिनंदन हि केले.
सौ. मनीषा वाळेकर ह्या २१ नोव्हेंबर २०१७ रोजी अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून पदावर विराजमान झाल्या होत्या. याकरिता शहरातील जणू सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा देखील दिला होता. आज त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झालेले असून त्यांनी आपल्या या एक वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करण्यासाठी दालनात एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष व गटनेते सदाशिव पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष व गटनेते प्रदीप पाटील, भाजपच्या अनिता आदक, मनसेच्या अपर्णा भोईर, शिवसेनेचे गटनेते राजेश शिर्के, रवींद्र पाटील आदींनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, विजय पवार, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, नगरसेवक निखिल वाळेकर, सचिन पाटील, रवींद्र पाटील, मोहन पाटील आदी उपस्थित होते.
सन १९९५ पासून अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता असून शहरातील नागरिकांनी वेळोवेळी शिवसेनेवर विश्वास दाखविलेला आहे. त्याचप्रमाणे या पूर्वीच्या आमच्या नगराध्यक्षांनी त्यांच्या परीने विकासकामे केली व त्याचा पुढचा टप्पा मी नगराध्यक्षा या नात्याने प्रलंबित असलेले तसेंच मोठ्या प्रकल्पांचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचं माझे ध्येय साध्य करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. असे नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी आपले मनोगत सांगितले.
तसेच मनिषा वाळेकर हे नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी पहिले प्रथम शहरातील कामाचा आढावा घेत, अंबरनाथ शहरातील महत्वाचे रस्ते, शुटिंग रेंज, नवीन प्रशासकीय इमारत, नाट्यगृह, शाळेची इमारत, प्राचीन शिवमंदिराचा परिसर सुशोभिकरण, नेताजी मैदान विकसित करणे, बहुउद्देशीय समाजमंदिर बांधणे, वृक्षारोपण, पाणी पुरवठा योजना, ज्येष्ठ नागरिक दिन, ग्रंथ प्रदर्शन, प्रथदिवे व्यवस्था, दिव्यांगांसाठी विविध उपक्रम, रात्र निवारा केंद्र बांधणे, हरित क्षेत्र विकास अंतर्गत बागा विकसित करणे, शिवाजी मार्केट जवळ अद्यावत फिश मार्केट, स्मशानभूमी विकसित करणे, चौक शुशोभीकरण, गणेश विसर्जन व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, महिला व बालकल्याण अंतर्गत विविध उपक्रम, गुणवंत शिक्षकांचा सत्कार, अनुकंपा तत्त्वावरील व लाड पागे समिती अंतर्गत वारसांना नियुक्ती करणे, कर वसुली व अर्थसंकल्प नियोजन, अग्निशमन केंद्र व रुग्णालय बांधनेचे नियोजन आणि स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत कामगिरी आदी कामे हि १ वर्षाच्या कार्यकाळात नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी केल्याने सर्वांची त्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मला नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली, त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडरे, शहराध्यक्ष अरविंद वाळेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याबद्दल त्या सर्वांचे नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी आभार मानले. याबरोबरच त्यांनी वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल सर्व पक्षाच्या नगरसेवकांचे ही आभार मानले. वर्षपूर्तीच्या सोहळ्याच्या कार्यक्रम व पत्रकार परिषदेत आलेल्या सर्व पत्रकारांचे आभार प्रदर्शन नगरसेवक निखिल वाळेकर यांनी केले.