मुंबई : प्रामाणिकपणा काय असतो, याचे उत्तम उदाहरण आज टॅक्सीचालक व नागपाडा पोलिसांच्या रूपाने पाहावयास मिळाले. टॅक्सीत विसरलेले 7 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने एवघ्या काही तासात इंग्लंडच्या महिलेला परत करण्यात आले. टॅक्सी चालकाच्या प्रामाणिकपणामुळे व नागपाडा पोलिसांच्या सतर्कतोमुळे मात्र देशाची प्रतिमा पुन्हा उजळ झाली. अन्यथा भारतात आल्यावर दागिने गहाळ झाल्यामुळे देशाची प्रतिमा मल्लीन झाली असती.
इंग्लंड येथे राहणाऱ्या 63 वर्षीय सिमम वोराजी या काही दिवसांपूर्वी भारतात आल्या होत्या. त्या कामानिनित्त सुरतहून मुंबईत आल्या होत्या. 18 नोव्हेंबर 2018 रोजी सिमम या मुंबई सेंट्रल येथून मुसाफिर खाना येथे जाण्यासाठी टॅक्सीत बसल्या. मुजफिर खान येथे त्या उतरल्या. सोन्याचा ऐवज असलेली बॅग टॅक्सीत राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत टॅक्सीचालक निघून गेला होता. त्या तात्काळ नागपाडा पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी सर्व हकीगत कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना सांगितली. पोउनि जाधव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कारकर यांना महिलेने सांगितलेले प्रकरण सांगितले.
सपोनि कारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पोलिसांची 2 पथके नेमण्यात आली. एक पथक गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर दुसरे पथक मुंबई सेंट्रल येथे पाठवण्यात आले. या पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे सिमम प्रवास करत असलेल्या टॅक्सीचा क्रमांक मिळवला. तांत्रिक माहितीच्या आधारे एमएच /01- एम-6713 या नंबरचा चालक मोहम्मद सिराज शेख हा मुंबई सेंट्रल येथे पोलिसांना भेटला. पोलिसांनी त्याच्याकडे बॅगेबाबत चौकशी केली असता सदर बॅग पोलीस ठाण्यात घेऊन येणार असल्याचे शेख पोलिसांना सांगितले.
दरम्यान, टॅक्सीचालक शेख याला घेऊन पोलिसांचे पथक पोलीस ठाण्यात आले. त्या बॅगेत सोन्याच्या बांगड्या (वजन अंदाजे 20 तोळे), रिंग 2 नग (अंदाजे 2 तोळे), नेकलेस 1 नग (अंदाजे 4 तोळे) असे एकूण 7 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. सदर दागिन्यांच पडताळणी करून ती बॅग सिमम वोराजी यांना परत करण्यात आली.
टॅक्सीचालक मोहम्मद सिराज शेख याचा प्रामाणिकपणा व नागापाडा पोलिसांनी तात्काळ सुरू केलेला तपास याचे कौतुक करून सिमम वोराजी यांनी त्यांचे आभार मानले.
प्रामाणिकपणे 7 लाख रुपयांचे दागिने परत केल्याबद्दल सपोनि कारकर, पोउनि जाधव, पोउनि चौधरी, पोउनि फडतरे, हवालदार पाटील, जाधव व पोलीस पथकाने टॅक्सी चालक मोहम्मद सिराज शेख याला पुष्पगुच्छ देऊन त्याचे कौतुक केले.