डोंबिवली :- ( शंकर जाधव ) उंबर्डे येथिल भराव भूमिसाठी आरक्षित असलेल्या १ हेक्टर जागेवर उभारण्यात आलेला जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रि
कल्याण डोंबिवली शहरात २४५ रुग्णालये, ३३० दवाखाने. १४० पॅथॉलॉजी लॅब आहेत या ठिकाणी निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने ही समस्या निकाली काढण्यासाठी पालिका प्रशासनाने १५ वर्षापूर्वी उंबर्डे येथे जीव वैद्यकीय कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारला होता. संबंधित ठेकेदारला हा प्रकल्प बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर १० वर्षांसाठी देण्यात आला होता. मात्र १० वर्षात या प्रकल्पातील यंत्र सामुग्री जुनाट झाल्यामुळे पालिकेच्या ताब्यात आलेला हा प्रकल्प नावापुरताच उरला होता. रुग्णालयीन घनकचऱ्याचे या प्रकल्पात विघटन होत नसल्यामुळे नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे खाजगी संस्थे मार्फत हा कचरा उचलून तो तळोजा येथील प्रक्रिया केंद्रात नेलाजात होता. मात्र या कचऱ्यावरील वाहतूक आणि प्रक्रियेसाठी येणारा खर्च परवडत नसल्याचे कारण देत अनेकदा रुग्णालयातील कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून उंबर्डे येथे प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरु होता. जुन्या प्रकल्पाचे बांधकाम कायम ठेऊन या ठिकाणी नव्याने मशिनरी बसवून प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेनंतर पीआरएस कंपनीने बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा तत्वावर ३ टन कचर्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तब्बल तीन वर्षापासून बांधून पूर्ण झालेला हा प्रकल्प केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत पडून होता. अखेर ऑक्टोबर अखेरीस या प्रकल्पाला पर्यावरण विभागाने मान्यता दिली असून १२ नोव्हेबर पासून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. ३ टनाची क्षमता असली तरी ४ टन कचर्याचे या प्रकल्पात विघटन करता येणार असून सध्या डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरातून अडीच टन रुग्णालयीन घनकचरा या प्रकल्पात आणला जात आहे.संबधित ठेकेदाराकडून रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा उचलून नेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी अधिभार आकारला जात असून संबधित ठेकेदाराकडून पालिकेला प्रती महा साडे पाच लाख रुपये रॉयल्टी मिळणार आहे.