प्रासंगिक लेख

काजळी. …..

          काल देवासमोर नंदादीप लावत होते. दिवाही लावला, हळदीकुंकू देवाला वाहताना पाहते तर दिवा मालवला होता. पुन्हा लावला आणि उदबत्ती घेतली आणि ती लावताना पाहते तर पुन्हा दिवा मालवलेला….तेल तर घातले होते मग काय झाले असेल…??? मग लक्षात आले की, मी वातीवर चढलेली काजळी घाई-घाईमध्ये काढलीच नव्हती. ती काजळी काढली आणि पुन्हा नंदादीप प्रज्वलित केला.. त्या ज्योतीच्या प्रकाशाने देव्हारा भरून गेला. प्रसन्न आणि मंगलमय वातावरण घरामध्ये तयार झाले….
आपल्या मनाचेही असेच असते ना…?? आपल्या मनात भावना, दया, प्रेम, करुणा सर्व काही असते पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात…जबाबदारीचे ओझे घेऊन वावरत असताना आपण वेगळ्याच विश्वात मग्न असतो. कुटुंबाच्या लहानमोठ्या गरजा, वडीलधार्‍यांची काळजी, मुलांचे भवितव्य, नोकरीच्या ठिकाणचेही बरेचसे दडपण यातच प्रत्येकजण दबून गेलेला असतो. आता तर सर्वच क्षेत्रात खूप चढाओढ आहे… शिक्षण असो, व्यवसाय असो की नोकरी असो प्रत्येकाला पुढे जायचे असते. या सर्व घाईगर्दीत तो स्वतःशीच स्पर्धा कधी करायला लागतो, हे त्याचे त्यालाच कळत नाही. घर, नोकरी आणि वेळ यांची सांगड घालत जगत असतो.
रोजचा हा ताळमेळ घालत तो स्वतःचाच चेहरा हरवून जातो. मनातील भावना, दया, करुणा विसरून गेल्यासारखा वागत असतो. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणेही विसरून गेलेला असतो. उदाहरणा दाखल… रस्त्यावर जातायेता कोणी अपघातात जखमी झालेले दिसले, वृध्द नागरीकांनी मदत मागितली,  अपंगाना मदत करण्याची वेळ आली तर यासर्वाला बगल देऊन दुर्लक्ष करून आपले इच्छित साधन्याकडे कल दिसून येतो. परमार्थ,  माणुसकी विसरत चालला आहे असे पूर्णपणे  म्हणता येणार नाही पण ‘जाऊ दे…आपल्याला काय त्याचे’, ही वृत्ती वाढते आहे.
हीच काजळी नकळत चढलेली असते मनावर, एक गंभीर मुखवटा घालून भावनाशुन्य होऊन आपण समाजात आणि आजूबाजूला वावरत असतो, जगत असतो. गरज आहे  ही काजळी काढून टाकण्याची. त्यासाठी स्वतःसाठी दिवसातील वेळ राखून ठेवायला हवा. आपण आज काय केले, कसे वागलो, कुणाला दुखावले का, का दुखावले, कशामुळे समाधान – आनंद मिळाला..याचे आत्मचिंतन नक्की करायला हवे…आपलीच आपल्याला नव्याने ओळख होईल. आपलाच आपण घातलेला मुखवटा लक्षात येईल….
या मुखवट्याची काजळी काढून टाकली तरच आपल्या भोवतालच्या माणसांशी आपण एकरूप होतो, त्यांची सुख-दुःख जाणू शकतो….सर्वांबरोबर त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकतो. मित्र-मैत्रिणी आणि परिवाराच्या अजून जवळ येतो आणि जसा संध्याकाळच्या नंदादीपाच्या चिमुकल्या ज्योतीच्या  प्रकाशाने देव्हारा भरून जातो तसेच मनावर जमा झालेली काजळी दूर करताच आपले घरही आनंदाने, सुख-समाधानाने भरून जाते…..

सौ. ज्योती शंकर जाधव, 
कोपरखैरणे, नवी मुंबई.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!