मुंबई – गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाल्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरला असून विधानसभा आणि विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे.
स्वतंत्र प्रवर्ग मराठा समाजासाठी तयार करून १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात गुरुवारी सादर करण्यात आले. त्यापूर्वी विधानसभेत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल सादर करण्यात आला. कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती केली. यासंदर्भात दुपारी कामकाजाला सुरुवात होताच विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर झाले आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले.
कृती अहवाल सादर केल्यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. उपसमिती धनगर आरक्षणासंदर्भातही नेमली जाईल आणि त्यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा एटीआर सादर करुन निकाली काढला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सकाळी विधानसभेत सांगितले. अहवालात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद योग्य ठरेल, असे या कृती अहवालात म्हटले आहे. विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही हे विधेयक चर्चेविना मंजूर झाले.