महाराष्ट्र

मराठा आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटीमध्ये नोकरी देण्याचा निर्णय – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

मुंबई, दि. 1 : मराठा समाजबांधवांनी राज्याच्या विविध भागात केलेल्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी काय करता येईल याबाबत गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे विधिमंडळात सांगितले होते. त्या अनुषंगाने आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबतच्या शासन निर्णयास अधीन राहून एस.टी महामंडळ नोकरी देणार आहे, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नुकतीच मराठा आंदोलकांची भेट घेतली होती. आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख श्री. ठाकरे यांनी या भेटीदरम्यान दिली होती. याशिवाय महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे लातूर विभागीय अध्यक्ष व्यंकटराव बिरादार यांनी मंत्री श्री. रावते यांना निवेदन देऊन मृत आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. या अनुषंगाने मृत आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. रावते म्हणाले, मराठा समाजबांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्याच्या विविध भागात शांततेत आंदोलने केली होती. पण काही दुर्दैवी घटनांमध्ये काही आंदोलकांना जीव गमवावा लागला. यामध्ये बहुतांशी तरुण आणि कमावत्या आंदोलकांचा समावेश होता. आता  या आंदोलकांच्या कुटुंबियांना पुन्हा सन्मानाने उभे करण्यासाठी एसटी महामंडळ त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या संवेदनांनुसार आंदोलनातील मृत आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!