डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील उपायुक्तांची खुर्ची अनेक महिन्यापासून रिकामी आहे. त्यामुळे डोंबिवलीकर पुरते वैतागले आहेत.यावर विरोधी पक्ष जरी शांत बसला असला तरी अनेक जागरूक नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. उपायुक्त नाहीत, आयुक्त तरी तुम्ही या अशी मागणी डोंबिवलीकरांकडून होत असताना आयुक्त गोविंद बोडके यांनी महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी डोंबिवली विभागीय कार्यालयात येणार असल्याचे सांगितले आहे.
नागरिकांनी अनेक कामांसाठी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.मात्र अनेक कामांसाठी पालिकेच्या कल्याण येथील मुख्यालयाकडे बोट दाखवले जाते. तसेच अनके महिन्यापासून या कार्यालयातील उपायुक्तांची खुर्ची खाली असल्याने हे कार्यालय नक्की कशासाठी असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे.पालिका आयुक्त बोडके यांनी डोंबिवली विभागीय कार्यालयात दर महिन्यात येणार असून नागरिकांना वेळ देणार असल्याचे सांगितले होते.मात्र प्रत्यक्षात तसे होत नसल्याने डोंबिवलीकरांना कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयात जावे लागते. मंगळवारी पालिका आयुक्त गोविंद बोडके डोंबिवली विभागीय कार्यालयात आले असता पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी डोंबिवली विभागीय कार्यालयात येणार असल्याचे आश्वासन दिले.