डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात एजंटच्या मध्यस्थीने विवाह नोंदणी होत असल्याचा आरोप भाजप नगरसेवक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी केला आहे. बुधवारी विवाह नोंदणीसाठी आलेले नागरीक ताटकळत उभे होते. यावेळी भाजप नगरसेवक नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत `ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांची भेट घेतली.
डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावर विवाह नोंदणी केली जाते. नोंदणीसाठी ठराविक तारीख दिल्यानंतर त्या दिवशी आलेल्या नागरिकांना तासनतास वाट पाहावे लागते.आठवड्यातून बुधवारी आणि गुरुवार असे दोन दिवस विवाह नोंदणीसाठी दिले जातात. मात्र ठराविक तारखेला विवाह नोंदणी केली जात नसल्याने नाईलाजाने त्यांना दुसऱ्या आठवड्यात यावे लागते. बुधवारी विवाह नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची गर्दी वाढल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यास जागा मिळाली नाही. यावेळी कार्यालयात आलेले भाजप नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांच्याकडे येथील नागरिकांनी पालिकेच्या वेळकाढू कामाची तक्रार केली. यावर नगरसेवक पेडणेकर यांनी `ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी कुमावत यांची भेट घेऊन याचा जाब विचारला.यांनतर कुमावत यांनी पाहणी करून लिपिक अमिता वरळीकर यांना लवकरात लवकर कामे करून नागरिकांना ताटकळत उभे करू नका असे सांगितले. भाजप नगरसेवक पेडणेकर यांचे यावेळी नागरिकांनी आभार मानले.