डोंबिवली : – ( शंकर जाधव ) राज्यात आपल्याच बांधवाना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. शहरी भागात पुरेसे पाणी असून आपल्याला पाण्याची बचत करावी लागणार आहे. आपण सर्वांनी पाण्याची बचत केली तरच गावोगावी पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या नागरिकांना येथून पाण्याचे टँकर पाठवणे सोपे जाईल. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवून आपापल्या विभागात स्वच्छता राखावी आणि पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम विभागातील शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक तथा रमेश म्हात्रे यांनी केले.
पश्चिमेस सिद्धार्थ नगरातील पायवाटा आणि बंदिस्त गटाराच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन केले यावेळी नगरसेवक म्हात्रे यांनी दलित वस्तीतील नागरिकांना मोलाचा सल्ला दिला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 65 मधील सिध्दार्थनगर येथे पायावाटा व बंदिस्त गटाराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. रमेश म्हात्रे यांच्या हस्ते नारळ वाढवून भूमीपूजन करण्यात आले. दोन स्थळी भूमीपूजन करण्यात आले यावेळी महिला व जेष्ठ नागरिकांना भूमीपूजनात सहभागी करण्यात आले होते. पंचवीस वर्षापूर्वी सिद्धार्थ नगरात पायवाटा व गटारांचे काम करण्यात आले होते. या वस्तीत नागरिकांना स्वच्छ आणि दूर्गंधीमुक्त जीवन जगता यावे म्हणून सिध्दार्थनगर मधील पायावाट व गटारांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. पायावाटा शेजारील गटार बंदिस्त करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार नूतनीकरणाचे काम होत असून सुमारे 41 लाख रुपये खर्च होणार आहेत. येथील नुतनिकरण विकास कामांतर्गत बंदिस्त गटारे, विद्युत रचना, पायवाटा, रस्ते अशी कामे होणार असून या नगरातील लोकांना मुबलक पाणी मिळणार आहे. परंतु येथील नागरिकांनी विभागात स्वच्छता राखली पाहिजे. यामुळे रोगराईला कुणीही बळी पडणार नाही. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा. यामुळे बचत झालेले पाणी इतरांना देता येईल, असा मोलाचा त्यांनी सल्ला यावेळी उपस्थित नागरिकांना दिला. भविष्यात या वस्तीत आणखीही पायाभूत विकास कामे केली जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.