ठाणे दि ५ डिसेंबर २०१८ : संत गाडेगाबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचा जाणा तंत्र असं म्हणत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन फिरणार असून या व्हॅनला जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आज जिल्हा परिषद आवारात हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला.
ठाणे जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, कल्याण या पाच तालुक्यातील १५० गावात ही व्हॅन फिरणार आहे. गावातील महत्वाच्या ठिकाणी या व्हॅनला उभं करून स्वच्छतेबाबत असणारी गाणी, जिंगल नागरिकांना ऐकवली जाणार असून यामुळे गावकऱ्यांना गावात शाश्वत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी उपयोग होणार आहे. या शुभारंभा प्रसंगी प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( स्वच्छता व पाणी ) छायादेवी शिसोद तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.