मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 9 च्या पथकाने रवि पुजारी टोळीच्या गुंडासह एकाला सांताक्रूझ परिसरात बेड्या ठोकल्या. या धडाकेबाज कारवाईत 4 पिस्तूल, 29 काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेला रवि पुजारी टोळीच्या गुंडाविरुद्ध सन 2006 साली दिग्दर्शक महेश भट यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, 2015 साली लोणावळा येथे दुहेरी हत्याकांडात याचा सहभाग होता, तर दुसऱ्या आरोपी उत्तर प्रदेश बिहारमधून शस्त्र आणून इतर टोळ्यांना पुरवत होता, अशी माहिती तपासादरम्यान उजेडात आली आहे. आरोपींना न्यायालयाने 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्हे शाखा कक्ष 9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना सांताक्रूझ परिसरात पिस्तूल घेऊन काही इसम येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सांताक्रूझ पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवर असलेल्या ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलजवळ सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार सादिक इब्राहिम बंगाली ऊर्फ बंटा (40), धवल चंद्रप्पा देवरमानी (37) तेथे येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 4 पिस्तूल व 29 काडतूस आढळून आले.
सादिक हा रवि पुजारी टोळीसाठी काम करायचा. तसेच दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गोळीबार व लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडात सहभागी होता, तर धवल हा उत्तर प्रदेश, बिहार येथून शस्त्र आणून छोट्या मोठ्या टोळ्यांना पुरवायचा, हे तपासादरम्यान समोर आल्याचे गुन्हे शाखा कक्ष 9 च्या पोलिसांनी सांगितले.
ही धडाकेबाज कारवाई गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी/पश्चिम) अभय शास्त्री, गुन्हे शाखा कक्ष 9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशा कोरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, शरद धराडे, पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक कोरे, विजेंद्र आंबवडेकर, हवालदार (बक्कल नं.14970) शिंदे, हवालदार (बक्कल नं. 30177) गावकर, पोलीस नाईक (बक्कल नं. 32272) पाटील, पोलीस नाईक (बक्कल नं. 32680) शेख, पोलीस नाईक (बक्कल नं. 33046) वारंगे, पोलीस नाईक (बक्कल नं. 33154) पेडणेकर, पोलीस नाईक (बक्कल नं. 00-864) राऊत, पोलीस शिपाई (बक्कल नं. 05-525) खरटमोल, पोलीस शिपाई (बक्कल नं. 03-1223) कांबळे, पोलीस शिपाई (बक्कल नं. 04-1174) महांगडे, पोलीस शिपाई (बक्कल नं. 05-304) पवार, पोलीस शिपाई (बक्कल नं. 05-632) (चालक) निकम आदी पोलीस पथकाने केली.